शिवसेनेच्या ठाकरे गटाचे बहुतांश सदस्य शिंदे गटाच्या अज्ञातवासात?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर: पालघर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक होत आहे. ठाकरे आणि शिंदे गटामध्ये त्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी  सदस्य संख्येचे समीकरण जुळवणे आवश्यक असल्यामुळे त्यासाठी सदस्य पळपळवी, दबावतंत्र, विविध प्रलोभने दाखविली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वीस सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या बहुतांश सदस्यांना शिंदे गटाने आपल्याकडे अज्ञातवासात ठेवल्याचा  आरोप ठाकरे गटातील एका सदस्याने केला आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदासह उपाध्यक्ष तसेच विषय समिती सभापतींची १६ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. दोन-चार दिवसांपासून मुख्य व महत्त्वाच्या असलेल्या अध्यक्षपदासाठी सदस्य पळवापळवीचे राजकारण जोर धरत आहे. सोबतच सदस्यांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी वेगवेगळय़ा क्लृप्तय़ा व दबावतंत्राचा जोरदार वापर होत आहे. पालघर जिल्हा परिषदेमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेची मोठी संख्या असल्याने अध्यक्षपद त्यांच्याकडे होते. उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. आता विद्यमान अध्यक्षांनी शिंदे गटाचा रस्ता धरला आहे. राज्यातील शिवसेना फुटीनंतर आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर शिंदे गटाचा डोळा आहे. त्यासाठी सदस्य फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचे बोलले जाते. उपाध्यक्षपदासाठीही शिंदे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादीकडे तसेच माकपकडे सदस्य संख्या असल्याने त्यांची भूमिका काय राहील हे येत्या निवडणुकीनंतरच कळणार आहे. शिंदे गटाने बहुमताची सदस्य संख्या राखल्यास भाजप, बहुजन विकास आघाडी यांच्या जोरावर शिंदे गटाचा सदस्य अध्यक्षपदावर विराजमान होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये वीस सदस्य संख्या असलेल्या ठाकरे शिवसेना गटाच्या बहुतांश सदस्यांना शिंदे गटाने आपल्याकडे अज्ञातवासात ठेवल्याची चर्चा आहे. तसेच गटनेता व इतर दोन सदस्यही शिंदे गटांकडे होते. मात्र हातावर तुरी देऊन ते परत माघारी फिरकले आहेत. त्यानंतरही त्यांच्यावर दबाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कायद्याचा धाक दाखवण्याचा ठाकरे गटाकडून आरोप 

ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या एका जिल्हा परिषदेच्या सदस्याला ठाकरे गटाने पळवल्याची तक्रार शिंदे गटातील जिल्हा परिषद सदस्यांने केली आहे. या प्रकरणात वेगवेगळय़ा कलमाखाली नवीन पनवेल पोलीस ठाण्यात पालघर जिल्हा परिषदेच्या ठाकरे गटाच्या गटनेत्यासह इतर अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  कायद्याचा धाक दाखवून राजकीय दबाव आणला जात असल्याचे आरोप गटनेत्याने केले आहेत.

राज्यातील राजकारण जिल्ह्यात 

ठाकरे गटाचे बहुतांश सदस्य हे शिंदे गटाकडे गेल्यामुळे त्यांना स्वतंत्र गट स्थापन करावा लागेल. तसे न झाल्यास सदस्यांनी पक्षाच्या विरोधात मतदान केल्यास त्यांच्यावर पक्षांतर बंदी येऊन त्यांचे पद जाण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात झालेल्या शिवसेना विरुद्ध शिवसेना राजकारणासारखे राजकारण पालघर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zilla parishad chairmanship shiv sena thackeray group shinde group ysh
First published on: 15-11-2022 at 00:02 IST