
सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणून ‘श्रीदेवी’ यांना ओळखले जाते.
श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटांमध्येही काम करायला सुरुवात केली होती. ‘रानी मेरा नाम’ हे श्रीदेवी यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे नाव आहे. यानंतर त्यांनी ‘जुली’, ‘सोलवा सावन’ आणि ‘हिम्मतवाला’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.
श्रीदेवी यांचा ‘हिम्मतवाला’ हा चित्रपट सर्वाधिक लोकप्रिय ठरला. या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार बनली. श्रीदेवीच्या ‘चांदनी’ चित्रपटामुळे तिचे नाव बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांच्या यादीत घेतले जाते.
‘चांदनी’ चित्रपटात श्रीदेवी ही मुख्य भूमिकेत होती. तिच्यासोबत ऋषी कपूर आणि विनोद खन्ना देखील या चित्रपटात झळकले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर श्रीदेवीला ‘लेडी अमिताभ बच्चन’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
मात्र श्रीदेवी यांनी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणे अचानक बंद केले होते. श्रीदेवी यांच्यामते, अमिताभ बच्चन हे ज्या चित्रपटात असतात. त्या चित्रपटात इतर कलाकारांना करण्यासाठी काहीही उरत नाही.
एकदा मुकुल आनंद हे ‘खुदा गवाह’ या चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन अमिताभ बच्चन यांच्याकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी या चित्रपटात श्रीदेवी नायिका व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती.
या चित्रपटापूर्वी श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन यांनी ‘इन्कलाब’ आणि ‘आखरी रास्ता’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.
पण आता या चित्रपटात श्रीदेवी त्यांच्यासोबत काम करणार नाही, हे बिग बींना चांगलेच ठाऊक होते.
मात्र बिग बींची अशी इच्छा होती की, श्रीदेवी यांनी त्यांच्यासोबत या चित्रपटात काम करावे. त्यासाठी त्यांनी एक विशिष्ट युक्तीचा वापर केला.
अमिताभ बच्चन यांनी श्रीदेवीला त्यांच्यासोबत काम करण्यासाठी एक छान उपाय शोधून काढला होता. त्यावेळी श्रीदेवी ही फिरोज खान यांच्यासोबत एका गाण्याचे शूटिंग करत होती.
त्या शूटिंगच्या ठिकाणी बिग बींनी गुलाबांनी भरलेला ट्रक पाठवला आणि जेव्हा तो ट्रक श्रीदेवीसमोर पोहोचला तेव्हा अमिताभ यांनी तिच्यावर फुलांचा वर्षाव केला.
हा सर्व प्रकार पाहून श्रीदेवी यांनी अमिताभसोबत काम करण्यास होकार दिला. पण त्यासोबत एक अटही घातली.
‘जर या चित्रपटात मला दुहेरी भूमिका मिळाली तरच मी या चित्रपटात काम करेन’, असे तिने बिग बींना सांगितले.
त्यावेळी त्यांनी श्रीदेवींची ती अट मान्य केली आणि तिला या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारायला मिळाली.
त्यामुळेच ‘खुदा गवाह’ चित्रपटात तिने आई आणि मुलीची भूमिका साकारली होती.