Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणामुळे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सध्या मुंबईतील आझाद मैदानात आहे. सुमारे दोन दशकांपूर्वी याच आझाद मैदानात तेही ऑगस्टम महिन्यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे ऐतिहासिक उपोषण झाले होते व त्यातून तीन मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे अण्णांच्या उपोषणाला यश आले होते. यामुळेच जरांगे पाटील यांचे याच आझाद मैदानातील आंदोलन आता यशस्वी होते का, याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे.
आझाद मैदानाला उपोषण, सत्याग्रह, आंदोलनाची जुनी परंपरा आहे. पूर्वी मंत्रालयावर निघणारे मोर्चे चर्चगेट स्थानकावरून सम्राट हाॅटेलपर्यंत जात असे. तेथे जाहीर सभा व्हायच्या. पण मोर्चांमुळे वाहतूक कोंडीचा फटका बसू लागल्याने इ. स. २००० च्या सुमारास मुंबई उच्च न्यायालयाने हुतात्मा स्मारक, चर्चगेट येथून मोर्चे काढण्यास मनाई आदेश लागू केला. तेव्हापासून साऱ्या उपोषण., मोर्चे किंवा आंदोलनाचे आझाद मैदान हे केंद्रबिंदू ठरले.
याच आझाद मैदानात ज्येेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे ऑगस्ट २००३ मध्ये झालेले उपोषण ऐतिहासिक ठरले होते. याच उपोषणातून प्रेरणा घेत अण्णा हजारे यांनी यूपीए सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात नवी दिल्लीतीस जतंरमंतरवर उपोषण केले होते. तत्कालीन लोकशाही आघाडी सरकारमधील सुरेश जैन, नवाब मलिक, डॉ. पद्मसिंह पाटील आणि डॉ. विजयकुमार गावीत या मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी अण्णा हजारे यांनी क्रांतीदिनी म्हणजे ९ ऑगस्टपासून याच आझाद मैदानात अमरण उपोषणास सुरुवात केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अण्णांनी आंदोलन मागे घ्यावे म्हणून हरप्रकारे प्रयत्न केले होते. पण अण्णा हजारे आपल्या मागण्यांवर ठाम होते. स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्टपूर्वी अण्णा हजारे यांचे उपोषण सुटावे म्हणून सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले होते. शेवटी १६ ऑगस्ट २००३ रोजी मागण्या मान्य झाल्यावर अण्णा हजारे यांनी माघार घेतली होती.
अण्णा हजारे यांच्या मागणीनुसार भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या आयोगाची स्थापना केली होती. सावंत आयोगाने केलेल्या चौकशीत अण्णा हजारे यांनी आरोप केलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील, सुरेश जैन, नवाब मलिक आणि डॉ. विजयकुमार गावीत यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. शेवटी सुरेश जैन, डॉ. पद्मसिंह पाटील आणि नवाब मलिक यांनी राजीनामा दिला होता. अशा प्रकारे अण्णा हजारे यांचे ऑगस्ट २००३ मधील आझाद मैदानातील उपोषण यशस्वी झाले होते.
मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानातच ऑगस्टमध्येच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला वाटेकरी करून घ्यावे, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. ओबीसी समाजात मराठा समाजाला वाटेकरी करून ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे. जरांगे यांची ही मागणी मान्य करणे सरकारलाही कठीण आहे.
यामुळेच अण्णा हजारे यांचे आझाद मैदानातील उपोषण वा आंदोलन यशस्वी झाले होते. तसे जरांगे पाटील यांनी ऑगस्ट महिन्यातच केलेल्या उपोषणाची यशस्वी सांगता होते का, याची उत्सुकता आहे.