नांदेड: भाजपाचे नेते खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम यांची सोमवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानंतर कदम यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्याचवेळी ‘आधी यातना आणि आता याचना’ असेही वरील भेटीचे वर्णन केले जात आहे.

खासदार अशोक चव्हाण मागील आठवड्यामध्ये शहरामध्ये दाखल झाले. गेल्या दोन महिन्यांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अन्य पक्षीयांना आपल्या पक्षात भरती करून घेण्याचे अभियान सुरू केल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या विस्तारासाठी खासदार चव्हाण यांनीही हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेस पक्षात असताना शेवटच्या कालखंडात चव्हाण यांनी बी.आर.कदम यांच्यावर वेळोवेळी अविश्वास दाखवत त्यांना पक्ष संघटनेतून दूर लोटले होते. काही समर्थकांनी कदम यांच्या विरुद्ध चव्हाणांकडे कानभरणी करत त्यांना बर्‍याच प्रसंगांमध्ये यातना दिल्या, त्याची जिल्ह्यामध्ये वेळोवेळी चर्चाही झाली.

गतवर्षी अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर कदम आणि त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस पक्षामध्येच राहण्याची भूमिका घेतली. त्यानंतर लगेचच पक्षाने त्यांना पुन्हा नांदेड उत्तर जिल्ह्याचे अध्यक्षपद दिले. पण गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर भास्करराव खतगावकरांसह काँग्रेसचे दोन माजी आमदार व त्यांचे समर्थक पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले. त्यानंतर आता कदम यांच्या पक्षत्यागाची चर्चा सुरू झाली आहे.

मागील काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षात कदम यांच्या कार्यपद्धतीवर पक्षनेत्यांपर्यंत तक्रारी करण्यात आल्या. त्यांना पदावरून हटविण्याची मागणीही काहींनी केली. या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांनंतर खा.चव्हाण यांनी सोमवारी सकाळी कदम यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांच्याशी तसेच त्यांचे पुत्र विश्वास यांच्याशी त्यांनी तासभर चर्चा केल्याची माहिती मिळाली. कदम यांनी काँग्रेस सोडून भाजपात यावे, असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या २६ तारखेला पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी नांदेडमध्ये येत असल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर झाले. त्यांच्या वरील दौर्‍याचे नियोजन चव्हाण यांच्यातर्फे सुरू असून त्यावेळी काही प्रमुख कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. चव्हाण-कदम भेटीमागे हाच संदर्भ असल्याचे दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी सभापती किशोर स्वामी कदम यांच्याकडे गेले होते. तसेच धनगर समाजातील प्रमुख कार्यकर्ते बालाजी वामनराव काळे, भुपेंद्रसिंग कामठेकर, गणपत जयवंतराव मुंडे प्रभृती तेथे हजर होते. कदम यांच्या भाजपा प्रवेशासंबंधी चर्चा झाल्याच्या माहितीला बालाजी काळे यांनी नंतर दुजोरा दिला. या अनुषंगाने बी. आर कदम यांना विचारले असता ते म्हणाले, खासदार अशोक चव्हाण एका बैठकीनिमित्त आमच्या प्रभागात सोमवारी आले होते. त्यानंतर ते माझ्या निवासस्थानी आले. आमच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली पण अद्याप मी निर्णय घेतला नाही. वरील भेटी बाबत मी आमच्या पक्षाचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्याशीही चर्चा केली आहे.