सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेच्या तराजूमध्ये आंबड म्हणून ताकद निर्माण करण्याचा महायुतीतील घटक असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी राज्यस्तरिय मेळावा मिरजेत घेउन आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न रविवारी झाला. आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविल्या जातील आणि जास्तीत जास्त जागा आपल्याच संघटनेला मिळतील असा विश्‍वास जनसुराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी या मेळाव्यात व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षाने विचारधारा सोडल्याने पक्षातून काही मंडळी बाहेर पडल्याचा दावा करत आपल्या पक्षांने कधीही विचारधारा बदलली नसल्याने सामान्य लोकांचा विश्‍वास संपादन केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संस्कार, संकल्प आणि सिध्दी या तत्वावर २००४ मध्ये उभारलेला जनसुराज्य तसा कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित असलेला पक्ष. मात्र, स्थापनेपासून या पक्षाने सांगली जिल्ह्यातही सत्तेच्या तराजूत आपले वजन टाकत सत्तेजवळ राहण्याची किमया साधली आहे. ज्यावेळी सत्तेवर दावा करत असताना दोन्ही गट समान पातळीवर आले तर छोट्या पक्षांना मोल प्राप्त होते. हेच मोल मिळवण्याचा जनसुराज्य शक्तीचा प्रयत्न आहे. प्रारंभीच्या काळात सुजाता पाटील यांना जिल्हा परिषदेत सभापती पद मिळाले.

जिल्हा परिषदेत आकड्याच्या गणितात बसवराज पाटील यांना उपाध्यक्ष पद देउन राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता काबीज केली होती. मात्र महापालिका क्षेत्रात या पक्षाला फारसे स्थान कधी मिळाले नाही. आता राज्यात महायुतीची सत्ता असल्याने सत्तेमध्ये वाटा मिळाला आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये जनसुराज्यचे प्रतिनिधीत्व आहे. तसेच महायुतीतील एक घटक पक्ष म्हणून विकास निधीही मिळत आहे. या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष कदम यांनी पक्ष विस्ताराचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला असून आता महापालिका निवडणुकीतही आपली ताकद दाखवण्याचा मनसुबा या पक्षाचा दिसून येत आहे.

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविल्या जात असल्याचे घटक पक्षाकडून सांगितले जात असले तरी पडद्याआड मोठा भाउ म्हणून भाजपकडून जागा वाटपात भाईगिरी होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. यामुळे सत्तेचा दावा करणारा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आपले वेगळे अस्तित्व दाखवण्यासाठी वेगळे लढण्याची चिन्हे आहेत, तर शिवसेना (शिंदे) पक्षाची ताकद मूळ शिवसेनेप्रमाणेच मर्यादित आहे. यामुळे हा पक्ष भाजपसोबतच असेल तरच झाकली मूठ राहणार आहे.

आता जनसुराज्य शक्ती संघटनेचा विस्तार महापालिका क्षेत्रात करण्यात आल्याने सत्तेसोबत राहूनही पक्ष आपले वेगळे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करणार हे स्पष्ट आहे. तसेच आगामी विधानसभा निवडण्ाुका समोर ठेवून पक्षाची वाटचाल सुरू आहे. संभाव्य महिला आरक्षण लागू झालेच तर मतदार संघ पुनर्रचना अपेक्षित असून त्यासाठीची मोर्चेबांधणी या राज्य स्तरिय मेळाव्यात दिसून आली. सध्या पक्षाचे अध्यक्ष डॉ.कोरे आणि अशोक माने हे दोन आमदार आहेत. ही संख्या वाढविण्याचे पक्षाचे प्रयत्न असून त्यासाठी खतपाणी भाजप पुरवेल अशी स्थिती सध्या तरी आहे. कारण भाजपच्या पक्ष विस्तारात प्रदेशाध्यक्ष कदम यांचेही योगदान मोलाचे ठरले आहे. जिल्हा बॅकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील यांना भाजपमध्ये घेण्यासाठीची पडद्याआडची बोलणी कदम व शेखर इनामदार यांनीच केली.

याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहमती दर्शवल्याने जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत प्रभावी असलेल्या वसंतदादा घराण्याला धक्का देण्याचे काम या कृतीने केले आहे. जनसुराज्यची वाढती ताकद मूळच्या भाजप नेत्यांना रूचणारी आहे असेही दिसत नाही. मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याशी जनसुराज्य शक्तीच्या पदाधिकार्‍यांशी असलेली जवळीक हीच खरी पोटदुखी ठरणारी आहे. महापालिका निवडणुकीवेळी हे दुखणे किती खोलवर रूजले आहे, त्यावर मलमपट्टी कशी केली जाते यावर पुढील राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत.