ठाणे: शिवसेनेतील फुटीनंतर शाखा कुणाच्या मालकीच्या यावरून गेल्या काही दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे गटामध्ये वाद उफाळून आला असतानाच आता शहरातील पदपथांवर शिंदे गटाने उभारलेल्या कंटेनर शाखांवर कारवाईची मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्याला शिंदे गटाने प्रतिउत्तर देत कंटेनर शाखा व्यावसायिक वापरासाठी नव्हे तर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उभारल्याचे म्हटले आहे. यामुळे कंटेनर शाखांवरून आता दोन्ही गटातील वाद वाढण्याची चिन्हे आहेत.
पदपथांवर उभारलेल्या कंटनेर शाखांचा नागरिकांना त्रास होत असल्याने त्याविरोधात तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. तर, पदपथांवर उभारलेल्या शाखांचे समर्थन करित नाही. पण, अनेक ठिकाणी पदपथांवर अतिक्रमणे आहेत, त्यावरही कारवाई व्हायला हवी. कंटेनर शाखा व्यावसायिक वापरासाठी नव्हे तर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उभारलेली आहे, असे प्रतिउत्तर शिंदे गटाने दिले आहे. यामुळे हा वाद वाढण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा सामना रंगला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यासह ठाण्यातील बहुतेक माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी समर्थन दिले. तर, खासदार राजन विचारे यांच्यासह काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले. या दोन गटामधील राजकीय वाद दिवसेंदिवस वाढत असून गेल्या काही दिवसांपासून शाखा कुणाच्या मालकीच्या यावरून दोन्ही गटात वाद सुरू आहे. शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गट आमने-सामने येत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.
हेही वाचा… सांगलीत वंचितच्या दाव्याने काँग्रेसपुढे प्रश्नचिन्ह
ठाण्यातील मनोरमानगर आणि शिवाईनगर परिसरात असे प्रकार घडल्याचे दिसून आले. काही दिवसांपुर्वीच मुंब्रा शहरातील मध्यवर्ती शाखा पूर्नबांधणीचे कारण देत शिंदे गटाने जमीनदोस्त केली होती. तर ही शाखा शिंदे गट बळकावत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे हे स्वत: आले होते. त्यावेळेस शिंदे आणि ठाकरे असे दोन्ही गटाचे कार्यकर्ते परिसरात जमल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. एकीकडे हा वाद रंगला असतानाच, शिंदे गटाने आता कंटेनर शाखेचे पर्याय पुढे आणला आहे. शिंदे गटाकडून शिवाईनगर, कासारवडवली, आनंदनगर भागात कंटेनर शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु पदपथांवर या शाखा उभारण्यात आल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाने या शाखांवर कारवाई करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली. पण, त्यावर कारवाई होत नसल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.
शहरातील पदपथावर कंटेनर उभे करून शाखा उभारल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. या संदर्भात महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु या कंटेनर शाखांवर महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. – नरेश मणेरा, माजी नगरसेवक, ठाकरे गट.
पदपथांवर उभारलेल्या शाखांचे समर्थन करित नाही. पण, अनेक ठिकाणी पदपथांवर अतिक्रमणे आहेत, त्यावरही कारवाई व्हायला हवी. कंटेनर शाखा व्यावसायिक वापरासाठी नव्हे तर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उभारलेली आहे. शाखा हे शिवसैनिकांसाठी मंदिर आहे. त्याठिकाणी पक्षाचे पदाधिकारी तिथे बसून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम करतात. नागरिकांना त्रास होत असेल तर हे कंटेनर इतरत्र स्थलांतरित करता येऊ शकतात. – प्रताप सरनाईक, आमदार, ओवळा-माजिवाडा मतदार संघ