सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना शिंदे गटात घेण्याचे प्रयत्न झाले, पण त्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. दीपावलीच्या काळात शिंदे गटात येण्याचे आमंत्रण त्यांना दिले होते. त्यासाठी त्यांच्याकडे फराळालाही गेलो होतो, असेही सत्तार म्हणाले. आमदार झांबड हे सध्या काँग्रेसमध्येही फारसे सक्रिय नाहीत. दीपावलीमध्ये त्यांना शिंदे गटात खेचण्याच्या हालचाली झाल्याचे आता समोरे येऊ लागले आहे. वैजापूर येथे एका खासगी साखर कारखान्याच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार झांबड यांनी वैजापूरमधील शेतकऱ्यांची गरज आणि साखर कारखानदारीची आवश्यकता या वर भाषण केले होते. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना मुंबईला येऊन भेटा, असे म्हटले होते. त्यानंतर झांबड यांना शिंदे गटात घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. या प्रक्रियेचा भाग म्हणून दीपावलीमध्ये फराळाच्या निमित्ताने सत्तार यांनी झांबड यांची भेट घेतली. याशिवाय भाजपचे मंत्रीही झांबड यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

हेही वाचा… राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेसाठी मुकुल वासनिकांची पायपीट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी यांची यात्रा मराठवाड्यातील नांदेड व हिंगोली जिल्ह्यात येणार असल्याने काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात जातील, या चर्चेला तसा पूर्णविराम मिळाला होता. मात्र, सत्तार यांनी अशोक चव्हाण यांच्या पक्षांतराच्या चर्चेतील जीव अजून संपलेला नाही, असे स्पष्ट केले. काँग्रेसचा महाराष्ट्रातील कॅप्टनच सध्या डळमळीत आसानावर बसलेला आहे. काँग्रेसमधील माझे मित्र अमर राजूरकर यांच्याशीही मध्यंतरी या विषयी चर्चा झाली होती. त्यांनीही अशोकरावांविषयी पक्षांतराच्या चर्चा सुरू असल्याचे सांगितले होते. अजूनही त्या शक्यता संपलेल्या नाहीत. पण शिंदे गट वाढावा म्हणून औरंगाबादमधून काँग्रेस आमदारांनाही गळ घातली जात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.