संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी पंतप्रधान आणि कर्नाटकचे भूमिपुत्र एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाची ताकद घटली असतानाच देवेगौडा कुटुंबातच पराभवांची मालिका सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत देवेगौडा यांचे पुत्र कुमारस्वामी आणि रेवण्णा विजयी झाले असले तरी कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल, रामनंग्राम या कुटुंबियांच्या पारंपारिक मतदारसंघातून पराभूत झाले. देवेगौडा हे मुख्यमंत्री झाले तेव्हा याच मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले होते. सुमारे तीन दशके हा मतदारसंघ देवेगौडा यांच्या कुटुंबियांकडे होता. मावळत्या विधानसभेत कुमारस्वामी यांची पत्नी निवडून आली होती. या वेळी कुमारस्वामी यांनी पत्नीऐवजी मुलाला संधी दिली होती. पण तो पराभूत झाला.

देवेगौडा कुटुंबियांमध्ये पराभवाची मालिका ही गेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू झाली. स्वत: देवेगौडा हे गेल्या लोकसभा निवडणुकीत टुमकूर मतदारसंघातून पराभूत झाले होते. त्यांनी त्यांच्या हसन या पारंपारिक मतदारसंघातून दुसरे पुत्र रेवण्णा यांच्या मुलाला उमेदवारी दिली होती. नातू निवडून आला पण आजोबा पराभूत झाले. कालच विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले देवेगौडा यांचे नातू निखिल लोकसभा निवडणुकीत मंड्या या पक्षाच्या पारंपारिक बालेकिल्ल्यातून पराभूत झाले होते. निखिल यांचा लोकसभेपाठोपाठ विधानसभा असा दुसरा लागोपाठ पराभव झाला.

आणखी वाचा-कर्नाटकची राज्यात पुनरावृत्ती करण्यास काँग्रेस किती सक्षम?

देवेगौडा स्वत: आणि नातू निखिल यांचा दोनदा पराभव झाल्याने देवेगौडा यांच्या कुटुंबियांनाच पराभवाचे पाठोपाठ धक्के बसत आहेत. देवेगौडा यांच्या कुटुंबातील सात जण विविध पदांवर निवडून आले आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दल म्हणजे देवेगौडा कुटुंबियांची खासगी मालमत्ता अशीच टीका नेहमी केली जाते. यंदाही देवेगौडा कुटुंबात हसन या पारंपारिक बालेकिल्ल्यात उमेदवारीवरून वाद झाला होता. रेवण्णा यांच्या पत्नीला या मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. पण कुमारस्वामी यांनी विरोध दर्शविला होता. रेवण्णा हे स्वत: आमदार आहेत. त्यांचा एक मुलगा खासदार तर दुसरा विधान परिषदेचा आमदार आहे. तरीही पत्नीला उमेदवारी हवी होती.

देवेगौडा यांचे गेली तीन दशके मंड्या आणि हसन या दोन जिल्ह्यांमध्ये वर्चस्व होते. पण यंदा मंड्यामध्ये सातपैकी दोनच जागा जनता दलाच्या निवडून आल्या आहेत. गेल्या वेळी सर्व सातही जागा जनता दलाने जिंकल्या होत्या. हसन जिल्ह्यातही पक्षाची पिछेहाट झाली. विशेष म्हणजे या दोन जिल्ह्यांमध्ये स्वत: देवेगौडा यांनी प्रचारासाठी तळ ठोकला होता.

आणखी वाचा-Karnataka : भाजपाच्या पराभवामुळे मुख्यमंत्री असलेल्या बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाचा अस्त?

यंदाच्या निवडणुकीत जनता दलाचे १९ आमदार निवडून आले आहेत. याशिवाय पक्षाच्या मतांची टक्केवारी जवळपास पाच टक्क्यांनी घटली आहे. देवेगौडा आता थकले आहेत. कुमारस्वामी आणि रेवण्णा या दोन मुलांमध्ये वाद सुरू आहेत. वोक्कालिंग समाज ही जनता दलाची हक्काची मतपेढी. पण या समाजाचे प्राबल्य असलेल्या भागांमध्येच जनता दलाला मोठा फटका बसला. देवेगौडा किंवा धर्मनिरपेक्ष जनता दलाचे भवितव्य कठीण असल्याचे मानले जाते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Along with the setback of the janata dal the series of defeats continues in the devegowda family itself print politics news mrj
First published on: 14-05-2023 at 13:04 IST