Maha Vikas Aghadi Dispute काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याची तयारी सुरू असतानाच महाविकास आघाडीत काँग्रेसने शनिवारी अधिकृतपणे स्वबळावर ही निवडणूक लढण्याची घोषणा केली. महाविकास आघाडीमध्ये वाढलेल्या या तणावामुळे सत्ताधारी आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये फायदा होण्याची चिन्हे दिसत आहेत. या निवडणुकांसाठी एकजूट दाखवावी, अशी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची मागणी धुडकावून लावत काँग्रेसने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागील कारण काय? महाविकास आघाडीतील या तणावाचा भाजपाला कसा फायदा होणार? समजून घेऊयात…
काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला?
‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले, “मुंबई काँग्रेसला बीएमसी निवडणूक स्वतंत्रपणे लढायची होती. आम्ही त्यांना तशी परवानगी दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान आम्ही (मित्रपक्षांबरोबर जागावाटप करून) तडजोड केली होती, पण आता आमच्या स्थानिक युनिटमधील पदाधिकाऱ्यांना वाटते की ही महानगरपालिका निवडणूक स्वतःच्या ताकदीवर लढली पाहिजे आणि यात काहीही गैर नाही. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्यभरातील कथित मतदार यादीतील अनियमिततेविरोधात महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनसेबरोबर रॅली काढल्यानंतर प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या, “काँग्रेस राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेशी हातमिळवणी कशी करू शकते?”

महाविकास आघाडीतील असंतोषाचे कारण काय?
पाच वर्षांहून अधिक काळानंतर, महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर ते जानेवारीदरम्यान तीन टप्प्यांत होणार आहेत. बीएमसीसह राज्यातील इतर महानगरपालिकांच्या निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकत्र येतील अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत, त्यामुळे शिवसेना (ठाकरे), शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीतील असंतोष वाढला आहे.

यादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार आपल्या ‘महाराष्ट्र मिशन २०२५-२०२९’च्या दिशेने वाटचाल करत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात मोठा फटका बसला होता. भाजपाने लढवलेल्या २८ पैकी फक्त ९ जागा पक्षाला जिंकता आल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या महायुतीला ४८ पैकी १७ जागा मिळाल्या होत्या, तर महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या होत्या.
मात्र, यानंतर अवघ्या पाच महिन्यांनी भाजपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) पाठबळ मिळाल्याने महायुतीने राज्य विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने २८८ पैकी २३५ जागा जिंकल्या, तर महाविकास आघाडीला केवळ ५० जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत एकट्या भाजपाने १३२ जागा जिंकल्या आणि फडणवीस पुन्हा महायुती सरकार २.० मध्ये मुख्यमंत्री म्हणून परतले.
महाविकास आघाडीतील तणावाबाबत मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
बीएमसीवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवून भाजपाने स्पष्ट केले आहे की, ते महायुतीतील आपल्या दोन्ही मित्रपक्षांसोबत ही निवडणूक लढवणार आहेत. राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत, भाजपाने तेथील स्थानिक परिस्थितीनुसार युतीचा निर्णय घेण्याचे अधिकार आपल्या स्थानिक युनिट्सना दिले आहेत.

काँग्रेसच्या स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर बोलताना फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्षाने बीएमसीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढल्या तरी फारसा फरक पडणार नाही. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत.” मुख्यमंत्री फडणवीस यांनी असाही दावा केला की, काँग्रेसची खरी समस्या केंद्र स्तरावरचे राहुल गांधी यांचे नेतृत्व आहे, जे लोकांना काय हवे आहे हे समजून घेण्यात अयशस्वी ठरले आहे. ते पुढे म्हणाले, “जोपर्यंत काँग्रेस आपल्या उणिवा स्वीकारत नाही आणि तळागाळातील लोकांचे प्रश्न हाती घेत नाही, तोपर्यंत त्यांचे भविष्य अंधकारमय राहील.”
बिहार निवडणुकीत विरोधी इंडिया आघाडीवर एनडीएने मोठा विजय मिळवल्यामुळे भाजपाचे मनोबलही उंचावले आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाच्या संभाव्य यशाबद्दल आत्मविश्वास व्यक्त करताना पक्षाच्या एका अंतर्गत व्यक्तीने सांगितले, “प्रत्येक निवडणुकीत नवीन आश्चर्य समोर येतात आणि एका निवडणुकीची दुसऱ्या निवडणुकीशी तुलना होऊ शकत नाही. मात्र, जेव्हा जेव्हा पक्ष कोणत्याही ठिकाणी चांगली कामगिरी करतो, तेव्हा सर्वत्र सकारात्मक वातावरण तयार होते.”
या वर्षाच्या सुरुवातीपासून पक्षाचे प्रमुख रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्य भाजपाने विविध कार्यक्रमांद्वारे राज्यभरात लोकांपर्यंत आपली पोहोच वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच विरोधी पक्षांतील स्थानिक नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आखलेल्या भाजपाच्या योजनेचा हा एक भाग आहे. गेल्या महिन्यात मुंबईतील भाजपाच्या नवीन मुख्यालयाची पायाभरणी करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते, “महाराष्ट्र भाजपाला कुबड्यांची गरज नाही. तो स्वतःच्या पायावर मजबूत आणि खंबीर आहे.”

ते पुढे म्हणाले, “भाजपा कार्यकर्त्यांनी केवळ विरोधकांचा पराभव सुनिश्चित करण्यासाठीच नव्हे, तर त्यांना पूर्णपणे संपवण्यासाठी आपले प्रयत्न दुप्पट केले पाहिजेत.” राज्य भाजपा मीडिया सेलचे प्रभारी नवनाथ बान म्हणाले, “भाजपामध्ये ‘Pause’ बटण नाही. सर्वोच्च नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाच्या योगदानाला महत्त्व दिले जाते आणि त्याची दखल घेतली जाते. संघटनात्मक वाढीचा विचार करून ते सर्व एकत्रितपणे काम करतात.”
