अमरावती : शहरातील ऐतिहासिक नेहरू मैदानावर महापालिकेची नवीन इमारत उभारण्याच्या प्रस्तावावरून महायुतीतील दोन पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरूनच यासंदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांचे म्हणणे आहे, तर या मैदानावर कोणतीही इमारत बांधण्यास विरोध असल्याचे भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी काँग्रेसचे नेते डॉ. सुनील देशमुख यांनीही या प्रस्तावाला विरोध दर्शविताना संजय खोडके यांच्यावर टीका केली आहे. हा मुद्दा आता चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत.
गेल्या महिन्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेत आढावा बैठक झाली होती. महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन मार्फत शहरातील विविध विकास प्रकल्पांची कामे करण्याच्या अनुषंगाने करारनामा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. याच बैठकीत नेहरू मैदान विकास, टाऊन हॉलचे नूतनीकरण, शहराकरिता मल्टीलेव्हल पार्किंग आणि अमरावती महापालिका नूतन प्रशासकीय इमारतीसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या होत्या. नेहरू मैदान, टाऊन हॉल आणि लगतचा परिसर दुर्लक्षित असून, तिथे कुठलीही सुविधा नाही. भविष्यात या जागेचा वापर चांगल्या कार्यासाठी होण्याची शक्यता नाही. कुठलेही नियोजन किंवा तरतूद नाही. उलट, नेहरू मैदानाच्या जागेचे विद्रूपीकरण झाले असून, प्रचंड दुरवस्था झाली आहे. कुणीही या जागेचा कसाही वापर करत आहे, असे परखड मत संजय खोडके यांनी व्यक्त केले आहे.
भाजपचा विरोध
दुसरीकडे, नेहरू मैदान, दसरा मैदान, सायन्सकोर मैदान अशा सर्वच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या मैदानांचे जतन करण्यात यावे, अशी मागणी भाजपने केली आहे. राजकमल चौकातील गजबजलेल्या जागेतून महापालिकेची इमारत हटवून ती पुन्हा दुसऱ्या गजबजलेल्या भागात (नेहरु मैदानात) नेण्याची कल्पनाच हास्यास्पद आहे. विद्यापीठ मार्गावर महापालिकेसाठी जागा उपलब्ध असताना नेहरू मैदानाचा बळी देणे योग्य नाही, असे डॉ. अनिल बोंडे यांचे म्हणणे आहे.
डॉ. सुनील देशमुखही विरोधात
विकासाच्या नावाखाली अमरावती शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र शहरातील लोकप्रतिनिधींनी रचले असल्याचा आरोप अमरावतीचे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे. सध्या असलेल्या महापालिकेच्या इमारतीच्या जागेवर व्यापारी संकुल बांधण्याचा घाट घातला जात असल्याची विश्वसनीय माहिती असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे, महापालिकेच्या अस्तित्वातील इमारतीच्या नूतनीकरणासाठी गतकाळात किमान पाच ते सात कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत, ही बाब नागरिकांपासून हेतुपुरस्सर लपवण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
नेहरू मैदान म्हणजे केवळ मोकळी जागा नसून ते अमरावतीच्या सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक जीवनाचे केंद्र आहे. हा निर्णय लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या मौन संमतीमुळे रेटून नेत आहेत काय, असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे. शहराच्या हितासाठी आणि भावी पिढ्यांसाठी सार्वजनिक जागांचे जतन करणे ही काळाची गरज आहे. असा कोणताही प्रयत्न भविष्यात नागरिकांच्या सहकार्याने हाणून पाडण्यात येईल, असा इशाराही डॉ. सुनील देशमुख यांनी दिला आहे.