सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : राजकारणात समांतर रेषांना उभा, आडवा किंवा अगदी काटकोनातही छेद द्यावा लागतो. दुसऱ्यांची रेषा पुसून असो किंवा स्वत:ची रेषा वाढवून असो, उभे-आडवे धागे विणताना सामान्य माणूस केंद्रस्थानी असावा अशी अपेक्षा असते आणि हीच जाणीव वाढविणारा शिवसैनिक अशी अंबादास दानवे यांची प्रतिमा. १६ लाखांच्या शहरात एखाद्या गरिबाला किमान १० रुपयांत जेवण मिळावे म्हणून योजना तयार होण्याआधी ‘शिवभाेजन’ चालविण्यास प्रोत्साहन देणारा… तसेच करोनाकाळात आपल्याच जवळच्या आप्तांवर अंत्यसंस्कार करण्यास काेणी पुढे येत नव्हते तेव्हा सहा जणांना अग्निडाग देणे हे आपल्या हातून घडलेले सर्वांत मोठे काम, असे मानणारा कार्यकर्ता आता राज्याच्या विरोधी पक्षनेते पदापर्यंत पोहोचला आहे.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
Doordarshan logo, saffron logo,
दूरदर्शनचा भगवा लोगो… रंगांना राजकारणात एवढं महत्त्व का?
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम

काही काळ भारतीय जनता पक्षात काम केल्यानंतर आपल्या आक्रमक स्वभावाला शिवसेना हाच पक्ष योग्य, हे ठरवून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे आणि पुढे मोठ्या बंडाळीत संघटना उद्धव ठाकरे यांच्यासमवेत उभी राहील याची काळजी घेतली. संघटनेत आणि संघटने – बाहेरही जशास तसे ही राजकारणाची कार्यपद्धती १५ वर्षांपासून अधिक काळ त्यांनी जिल्हाप्रमुख म्हणून वापरली. संघटनेतील माणसे जोडून ठेवायची असेल, तर त्यांना सतत काम द्यावे लागते. सतत पक्षप्रतिमा लोकांसमोर ठेवावी लागते, याचे उत्तम भान त्यांनी जपले. त्यामुळे कावड यात्रेपासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत अनेक कार्यक्रम ते आखतात. महापालिकेच्या राजकारणातून सुरुवात करणारे अंबादास दानवे यांना पालिकेतील चुकाही दिसायच्या. सत्तेत असताना सहकाऱ्यांनी केलेल्या चुकांंना सांभाळून घेताना संघटनेला सकारात्मक कार्यक्रम दिले.

विरोधात असताना सत्ताधाऱ्यांच्या दारात अगदी ट्रॅक्टरनी कचरा टाकण्यापासून ते जायकवाडीला हक्काचे पाणी मिळावे म्हणून दानवे यांनी काँग्रेसचे नेते, तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना घेराव घातला होता. अशा आंदोलनात प्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनाही ते आडवे जात, हेही औरंगाबादकरांनी पाहिले आहे. शपथपत्रात व्यवसाय म्हणून सामाजिक कार्य असा उल्लेख असणाऱ्या ५२ वर्षीय दानवे यांनी आंदोलने मात्र खूप आयोजित केली. १९९९ पासून उपजिल्हाप्रमुख, महापालिकेत सभागृहात अजबनगर प्रभागाचे सदस्य म्हणून काम करणारे दानवे हे आक्रमक नेते. पण प्रत्येक आंदोलन आणि आखणीमध्ये अभ्यास मात्र सतत असतो.

हेही वाचा : प्रकाश आबिटकर : विकास आणि जनतेशी नाळ

समाजशास्त्र विभागात पदव्युत्तर शिक्षण, त्याचबरोबर वृत्तपत्र विद्या पदव्युत्तर शिक्षण, विधि शाखेत द्वितीय वर्षाचा अभ्यास पूर्ण केलेला असल्याने रस्त्यावरच्या आणि प्रसंगी न्यायालयाच्या लढाईपर्यंत जाणाऱ्या दानवे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा मात्र खासदार होण्याची. त्यामुळे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी मतभेद कायमचे. या सगळ्या धबडग्यात प्रसंगी त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे धार्मिक व जातीय ध्रुवीकरणाचे अनेक प्रयोग पक्षहिताला पाठिंबा देणारेच होते यावरून उलट-सुलट चर्चा सुरू असतात.

हेही वाचा : महेश खराडे : रस्त्यावरच्या लढाईतील योध्दा

विधान परिषद निवडणुकीत त्यांना एमआयएमच्या नगरसेवकांनीही मदत केल्याची चर्चा असो किंवा मराठा ध्रुवीकरण करत लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या भूमिकेवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे आक्षेपही आता मराठवाड्यात नवे नाहीत. पण असे असले तरी दानवे हे पक्षाची प्रतिमा सतत अधिक चांगली राहावी यासाठी कार्यरत असतात आणि संघटनेलाही त्याच दिशने पुढे नेतात. त्यांच्या याच नेतृत्वगुणांमुळे आता त्यांच्यावर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.