भारतीय जनता पक्षाने पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. देशातील आम आदमी पक्षाचे एकमेव लोकसभा सदस्य आणि जालंधरमधून लोकसभा निवडणूक २०२४ साठी पक्षाचे घोषित उमेदवार सुशील कुमार रिंकू यांनी बुधवारी संध्याकाळी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत दिल्लीत दुपारी चार वाजता सुशील रिंकू पक्षात सामील झाले. यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप पुरीही उपस्थित होते. रिंकू यांच्याबरोबर आम आदमी पक्षाच्या जालंधर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार शीतल अंगुरल यांनीही भाजपात प्रवेश केला. सुशील रिंकू भाजपामध्ये दाखल झाल्याने लोकसभा निवडणुकीत जालंधरच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. त्याचा परिणाम पंजाबच्या इतर जागांवर पाहायला मिळतोय. डिसेंबरमध्ये विक्रमी संख्येने विरोधी खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले होते, त्यात सुशील कुमार रिंकू यांचाही समावेश होता. जेव्हा संसदेच्या सभागृहात दिल्ली सेवा विधेयकावर चर्चा सुरू होती, तेव्हा सभागृहाच्या वेलमध्ये येऊन त्यांनी गोंधळ घातला होता. तसेच काही कागद फाडून सभापती ओम बिर्ला यांच्या दिशेने फेकले होते. निलंबनानंतर त्यांनी संसदेसमोर ठाण मांडून निलंबनाचा निषेध केला होता. आता तेच रिंकू भाजपामध्ये दाखल झाले आहेत.

सुमारे वर्षभरापूर्वी सुशील कुमार रिंकू यांनी काँग्रेस सोडून आपमध्ये प्रवेश केला होता. २०२३ मध्ये जालंधर लोकसभा मतदारसंघातून AAP च्या तिकिटावर पोटनिवडणूक जिंकून पहिल्यांदाच ते खासदार झाले. आम आदमी पार्टीमध्ये एक वर्षाहून कमी काळ राहिल्यानंतर सुशील रिंकू आता भाजपामध्ये दाखल झाले आहेत. सुशील कुमार रिंकू २०१७ ते २०२२ पर्यंत जालंधर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार शीतल अंगुरल यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. माजी खासदार संतोख चौधरी यांचे १४ जानेवारी २०२३ रोजी राहुल गांधी यांच्या भारत जोडो भेटीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर जालंधर लोकसभा जागेवरील पोटनिवडणुकीच्या अगदी आधीच सुशील कुमार रिंकू यांनी काँग्रेस सोडली आणि ५ एप्रिल २०२३ रोजी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. ‘आप’ने त्यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे केले. काँग्रेसमधून आलेल्या सुशील रिंकू यांच्या मदतीने ‘आप’ने जालंधरमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. पोटनिवडणूक जिंकून रिंकू पहिल्यांदाच खासदार झाले आणि ‘आप’ने लोकसभेत प्रवेश मिळवला. त्यांनी माजी खासदार संतोख चौधरी यांच्या पत्नी कर्मजीत कौर यांचा ५८ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. रिंकू यांना ३,०२,२७९ मते मिळाली होती.

राजकीय परिचय

रिंकू चार दशकांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांचे वडील आणि काका दोघेही काँग्रेस पक्षाच्या स्थानिक संघटनेत कार्यरत होते. त्यांचे वडील दिवंगत राम लाल १९९७ आणि २००२ मध्ये जालंधरचे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यांची पत्नी सुनीता २००७ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आली. रिंकू हे विद्यार्थीदशेतच राजकारणात आले. सुशील रिंकू १९९० मध्ये NSUI चे सक्रिय सदस्य होते. २००२ च्या लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्या म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या नजरेत आले. २००६ मध्ये महापालिका निवडणूक लढवली आणि नगरसेवक झाले. ते दोन वेळा नगरसेवक होते. जालंधर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून एकदा आमदार झाले. दुसऱ्या निवडणुकीत पराभव झाला. त्यांचे वडील राम लाल हे माजी नगरसेवक राहिले आहेत. पत्नी डॉ.सुनीता रिंकू याही दोन वेळा नगरसेवक झाल्या आहेत. १९९० पर्यंत ते काँग्रेसच्या एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेचे सक्रिय सदस्य होते. जालंधरच्या DAV कॉलेजमधून ते पदवीधर झाले. १९९४ मध्ये श्रीगुरु रविदास कल्चरल सोसायटीचे अध्यक्ष म्हणून ते निवडून आले.

खरं तर ते आधीच काँग्रेसचे बूथस्तरीय कार्यकर्ते होते. १९९२ च्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ते पक्षात सामील झाले होते. २००६ मध्ये त्यांनी जालंधर महानगरपालिकेत नगरसेवक बनून त्यांची पहिली निवडणूक लढत जिंकली होती. त्यांनी जालंधर पश्चिम विधानसभा जागेवरून २०१७ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली, जेव्हा त्यांनी तीन वेळा आमदार आणि माजी मंत्री भगत चुन्नीलाल यांचे पुत्र असलेले भाजपाचे महिंदर पाल भगत यांचा पराभव केला.

मतदानाची टक्केवारी ५४.७ टक्के एवढी कमी असूनही रिंकू यांना एकूण मतांच्या वाट्यापैकी ३४.०५ टक्के मते मिळाली, ज्यामुळे २०१९ मध्ये AAP च्या २.५ टक्क्यांच्या मतांच्या वाट्यामुळे एकूण टक्केवारी वाढली. काँग्रेसची मतांची टक्केवारी ३७.९ टक्क्यांवरून २७.४४ टक्क्यांपर्यंत घसरली, तर भाजपा शिरोमणी अकाली दलाच्या मागे चौथ्या स्थानावर फेकला गेला. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या घवघवीत यशामुळे ‘आप’साठी लोकसभा निवडणुकीतही चांगले यश मिळण्याची आशा आहे. अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पक्षाला २०२४ मध्ये पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी आणखी ११ महिने देण्याची मतदारांना विनंती केली आहे.

सर्वच पक्षांची राजकीय समीकरणे बदलणार

सुशील कुमार रिंकू हे जालंधरमधील रविदासिया समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मोठे नाव आहे. ते दीर्घकाळ काँग्रेसमध्ये आहेत. आमदारही होते. लोकांमध्ये रिंकूचा स्वतःचा एक वेगळा मतदार असून, त्यांना जनाधार आहे. तसेच जालंधर लोकसभा मतदारसंघातील शहरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा चांगला दबदबा आहे. जालंधर लोकसभा मतदारसंघात सुमारे दीड लाख हिंदू मते आहेत. भाजपाने जालंदर लोकसभा मतदारसंघातून सुशील रिंकू यांना उमेदवारी दिल्यास भाजपा पूर्णतः स्पर्धेत उतरल्याचं पाहायला मिळेल. काँग्रेस अद्याप उमेदवार दिलेले नाहीत.