Arvind Kejriwal Rajya Sabha Entry Speculation : फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये मोठा दिलासा मिळाला. लुधियाना पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीत ‘आप’चे उमेदवार संजीव अरोरा यांनी दणदणीत विजय मिळविला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भारत भूषण आशू यांचा तब्बल १० हजार मतांनी पराभव केला. अरोरा हे प्रसिद्ध उद्योजक असून सध्या ते आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदारही आहेत. त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री आणि दोन वेळा आमदार राहिलेले भारत भूषण आशू यांचा पराभव केला आहे. भाजपानेही या निवडणुकीत पक्षाचा उमेदवार उतरविला होता, मात्र तो चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. दरम्यान, अरोरा हे विधानसभेवर निवडून गेल्यानंतर पंजाबमधील राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या जागेवरून अरविंद केजरीवाल हे राज्यसभेत जाणार का? याचीच उत्सुकता अनेकांना लागली आहे.
लुधियाना पश्चिम या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक हिंदू मतदार आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’चे उमेदवार गुरप्रीत बसी गोगी यांनी या मतदारसंघातून विजय मिळविला होता. मात्र, गेल्यावर्षी बंदूक साफ करताना अचानक गोळी सुटून त्यांचा मृत्यू झाल्याने लुधियाना मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. दिल्लीतील पराभव व पंजाबमधील सरकार अडचणीत असताना आम आदमी पार्टीला पोटनिवडणुकीत मिळालेला हा विजय संजीवनी देणारा ठरला आहे.
दरम्यान, संजीव अरोरा यांचा पोटनिवडणुकीत विजय झाल्यानंतर अरविंद केजरीवाल हे राज्यसभेत जातील अशी अटकळ विरोधकांनी लावली होती. मात्र, दिल्लीतील पत्रकार परिषदेत केजरीवाल राज्यसभेवर जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यसभेत कुणाची वर्णी लावायची हे आमच्या पार्टीने नेतेच ठरवतील, माझी राज्यसभेत जाण्याची मुळीच इच्छा नाही, असं केजरीवाल यांनी सांगितलं आहे. या पत्रकार परिषदेतून केजरीवालांनी काँग्रेसच्या नेतृत्वालाही लक्ष्य केलं आहे.
आणखी वाचा : पोटनिवडणुकांचे निकाल भाजपासाठी धोक्याची घंटा? किती जागांवर झाला पराभव?
नेमके काय म्हणाले अरविंद केजरीवाल?
- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यसभेत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
- संजीव अरोरा यांच्याजागी राज्यसभेत कुणाची वर्णी लावायची हे पक्षातील नेतेच ठरवतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
- यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर थेट आरोप करत त्यांना भाजपाची ‘बाहुली’ म्हटलं आहे.
- भाजपाचा पराभव करायचा असेल तर आम आदमी पार्टीत सामील व्हा काँग्रेसकडून अपेक्षा ठेऊ नका, असं आवाहन त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना केला.
- केजरीवाल यांच्या या वक्तव्यामुळे आम आदमी पार्टी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
- आगामी निवडणुकांमध्ये फक्त आप आणि भाजपामध्येच थेट लढत होईल, त्यात काँग्रेस कुठेही नसेल, असे भाकीतही त्यांनी केले आहे.
भगवंत मान सरकार पहिली कसोटी उत्तीर्ण
लुधियाना पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक ही आम आदमी पार्टीसाठी एक प्रकारची कसोटी होती. दिल्लीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर पक्ष पुन्हा सावरू शकतो का? हे पाहणे महत्त्वाचे होते. लुधियानाची पोटनिवडणूक जाहीर होताच ‘आप’ने फेब्रुवारीमध्येच संजीव अरोरा यांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच अरोरा यांनी लुधियानात प्रचार सुरू केला होता. अरविंद केजरीवाल यांनी ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी पक्षातील अनेक स्टार नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरविले होते.

संजीव अरोरा यांना मंत्रीपदाचे आश्वासन
लुधियाना पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या. त्यांनी मतदारांना आवाहन केले की, काँग्रेसच्या रागीट आणि अहंकारी उमेदवाराला मतदान करू नका. त्याऐवजी आम आदमी पार्टीच्या विनम्र व मेहनती उमेदवाराला निवडून द्या. पोटनिवडणुकीत अरोरा विजयी झाले, तर त्यांना मंत्रीपद देऊन लुधियानासाठी अनेक प्रकल्प आणू, असे आश्वासनही केजरीवाल यांनी मतदारांना दिले होते. जर लुधियानाच्या पोटनिवडणुकीत आपचा पराभव झाला असता तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणखीच लक्ष्य केलं असतं. पंजाबमधील काँग्रेस व भाजपाच्या नेत्यांनी असा आरोप केलाय की, दिल्लीतील ‘आप’च्या नेतृत्वाकडून पंजाब सरकारचे सूत्र हातात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. सरकारी नियुक्त्या, व्हीव्हीआयपी संस्कृतीचे पालन, ड्रग्सविरोधातील अपयश आणि महिलांसाठी निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या योजना राबविण्यात सरकार अपयशी ठरतंय, असं विरोधकांचं म्हणणं आहे.
हेही वाचा : BJP Defeat in Gujarat : आमदार फुटल्यानंतरही ‘आप’ने गुजरातमध्ये भाजपाला हरवलं; पोटनिवडणुकीत नेमकं काय घडलं?
पंजाबमध्ये काँग्रेसची पुन्हा घसरगुंडी
लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा (२०१२, २०१७) आमदार राहिलेले भारत भूषण आशू यांचा २०२२ मध्ये ‘आप’चे उमेदवार गुरप्रीत बसी गोगी यांनी पराभव केला होता. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घेण्यात आल्याने भारत भूषण आशू हे विजयाची आशा बाळगून होते. यावेळी विजय मिळवला असता, तर कथित भ्रष्टाचार प्रकरणात आप सरकारने एक वर्ष तुरुंगात टाकल्याचा ‘सूड’ घेण्याची त्यांना संधीही मिळाली असती. मात्र, त्यांच्या प्रचारावेळीच काँग्रेसमध्ये फाटाफूट दिसून आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि लुधियानाचे खासदार अमरिंदर सिंग राजा वडिंग तसेच विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा यांनी आशू यांच्या प्रचारापासून स्वतःला दूर ठेवलं होतं. तर माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, वरिष्ठ आमदार राणा गुरजीत सिंह आणि परगट सिंह यांनी त्यांना सक्रिय पाठिंबा दिला होता. आपने याच मुद्द्याला हाताशी धरून काँग्रेसला लक्ष्य केले होते.