२०२४च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी विशिष्ट चेहऱ्यांनाच संधी दिली. तर त्याचा फायदा पंतप्रधान मोदींनाच होईल, असं विधान एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात भूमिका मांडली.

काय म्हणाले ओवैसी?

“२०२४ च्या निवडणुकीसाठी विरोधकांनी सर्व ५४० जागांवर लक्ष केंद्र करायला हवं. प्रत्येक ठिकाणी एकजुटीने भाजपाविरोधात लढायला हवं. कोणत्याही पक्षाने एकट्याने भाजपाविरोधात लढण्याचा प्रयत्न केला, तर भाजपाचा विजय निश्चित आहे. आगामी निवडणुकीत विरोधकांनी विशिष्ट चेहऱ्यांनाच संधी दिली आणि ही निवडणूक अरविंद केजरीवाल विरुद्ध नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी, अशी झाली तर त्याचा फायदा भाजपा आणि पंतप्रधान मोदींनाच होईल”, अशी प्रतिक्रिया ओवैसी यांनी दिली.

दरम्यान, यावेळी ममता बॅनर्जी २०२४ मध्ये नरेंद्र मोदींविरोधात पंतप्रधान पदाच्या उमेदवार असतील का? असं विचारलं असता, “ममता बॅनर्जी या पंतप्रधान पदाच्या उमेदवार असतील की नाही, याबाबत निश्चित सांगता येणार नाही. कारण त्यांनी अनेकदा गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे, तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींचे अनेकदा कौतुकही केलं आहे”, असं ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान पदासाठी अनेक दावेदार

महत्त्वाचे म्हणजे २०२४ मध्ये पंतप्रधान पदासाठी अनेक दावेदार आहेत. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीतील यशानंतर आपने थेट पंतप्रधान पदावर दावा केला आहे. २०२४ ची निवडणूक अरविंद केजरीवाल विरुद्ध पंतप्रधान मोदी अशीच असेल, असं आम आदमी पक्षाने म्हटलं आहे. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री यांनी पक्षाचे नाव बदलून थेट भारत राष्ट्र समिती असं केलं आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विविध नेत्यांची भेट घेतली होती. तर ममता बॅनर्जी यांनीही २०२४ मध्ये विरोधकांनी एकत्र यावं, अशी भूमिका मांडली होती. त्यासाठी त्यांनी भाजपा विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेटही घेतली होती.