मुंबई : मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी अडीच वर्षे राहून आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत मोठे योगदान दिलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री व भाजपाचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण भाजपात उपरे राहिले आहेत. मुंबईत मराठा आरक्षण आंदोलन पेटले असताना चव्हाण मात्र स्वत:च्या नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यात व्यस्त आहेत.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना अशोक चव्हाणांकडे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद दिले होते. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी बृहत खंडपीठासमोर व्हावी यासाठी चव्हाण यांनी नेटाने प्रयत्न केले. न्यायालयात बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ वकील नेमले. सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. पंतप्रधान व राष्ट्रपती यांची भेट घेत आरक्षणावरील ५० टक्केची मर्यादा उठवा, अशी मागणीही केली.
मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू भक्कम करण्यात अशोक चव्हाणांचे योगदान आहे. जून २०२२ मध्ये ‘मविआ’ सरकार गेले आणि ‘महायुती’चे सरकार आले. त्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद ऑक्टोबर २०२२ मध्ये भाजपाचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे गेले. मनोज जरांगे यांचे आंदोलन पेटल्यानंतर पाटील यांच्या जागी अहिल्यानगर जिल्ह्यातील मातब्बर मराठा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या समितीचे अध्यक्षपद देण्यात आले.
आरक्षणाच्या खटल्यात शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष समुपदेशकांची नियुक्ती करणे, त्यांचे मानधन ठरवणे, विधिज्ञ व तज्ञ मंडळीचा सल्ला घेणे, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबाजवणी करणे आदी कामे मंत्रिमंडळ उपसमितीची आहेत. या समितीमध्ये राज्य शासनातील मंत्री सदस्य आहेत. अशोक चव्हाण राज्यसभा सदस्य असल्याने त्यांचा सहभाग शक्य नव्हता. मात्र मुंबईत मराठा आंदालन पेटेले असताना मराठवाड्यातील मराठा नेते असलेले चव्हाणांनी अतिवृष्टी नुकसान पाहणी दौरे करणे आश्चर्यजनक आहे.
अशोक चव्हाणांची काँग्रेसमधील राजकीय कारकिर्द ३८ वर्षाची आहे. असून ती काँग्रेसमधली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये भाजपमध्ये दाखल झाले. चव्हाण यांच्या येण्याने नांदेडमध्ये भाजपला लाभही झाला. पण, चव्हाण मात्र भाजपमध्ये अजूनही म्हणावे असे सक्रीय दिसत नाहीत. मराठा आंदोलन पेटले असताना चव्हाणांचे त्यापासून पूर्णपणे अलिप्त राहण्याने ते भाजपात अजूनही उपरे असल्याचे दाखवते आहे.
मी आता राज्यसभा सदस्य आहे. मी राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये राज्य सरकारचे मंत्री सदस्य आहेत. मी नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीने केलेल्या नुकसानीची पाहणी करतो आहे. पक्षाने मला विचारले तर मी मराठा आंदोलनप्रकरणी मदतीस येईन. पण, मला अद्याप पक्षाकडून विचारणा झालेली नाही. –अशोक चव्हाण, भाजपाचे राज्यसभा सदस्य