राज्यातील सत्तांतराच्या घडामोडीत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतल्यानंतर मंत्रिपद हमखास मिळेल, असा आशावाद बाळगून असलेल्या ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांमध्ये आता अस्वस्थता पसरली आहे. थेट बच्चू कडूंनी ‘आता होईन नाहीतर अडीच वर्षानंतर मंत्री होईन,’ असे वक्तव्य केल्याने त्यांची नाराजीही उघड झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- अंधेरी पूर्व पोटनिवडणूक ; काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंब्याच्या बदल्यात पाठिंबा

बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजप, अपक्ष आणि मित्रपक्षातील काही आमदारांच्या साथीने सत्तास्थापना केली. शिंदे गटाला प्रहारने पाठिंबा दिला. मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. पण, शिंदे यांना सुरूवातीपासून साथ देणाऱ्या बच्चू कडू यांची वर्णी लागली नाही. याबाबतची नाराजी त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवली. एकनाथ शिंदे यांनी आपल्याला मंत्री करण्याचा शब्द दिला आहे, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले. आता बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता वाढत चालल्याचे दिसून आले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मानाचे स्थान मिळेल, हा कार्यकर्त्यांचा विश्वास डळमळीत होत आहे.

हेही वाचा- ऋतुजा लटके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते मैदानात उतरणार

बच्चू कडू आणि त्यांचा प्रहार पक्ष हा आक्रमकतेसाठी ओळखला जातो. वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करून बच्चू कडू यांनी जनतेचे लक्ष वेधून घेतलेच शिवाय सरकारलाही मागण्या मान्य करण्यास भाग पाडल्याचे वेळोवेळी दिसून आले. शेतकरी, सर्वसामान्यांसाठी लढणारा, सरकारशी दोन हात करणारा नेता, अशी बच्चू कडू यांची प्रतिमा तयार झाली. प्रहार पक्षाचे जाळेही विस्तारले. पण, जेव्हा त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रहार पक्षाची आक्रमकता कमी झाल्याचे  बोलले जाऊ लागले. सरकारमध्ये असताना जर आपले प्रश्न सहजरीत्या सुटत असतील, तर आंदोलनांची गरज काय, असे बच्चू कडू यांचे म्हणणे होते.

हेही वाचा- विश्लेषण : उद्धव ठाकरेंसाठी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक आव्हानात्मक कशी ठरणार?

सत्तेत राहण्याचे फायदे अधिक असले, तरी अनेकवेळा बचावात्मक पवित्रा घ्यावा लागतो. तरीही मंत्रिपदावर राहून लोकांची कामे अधिक प्रभावीपणे करता येतात, हे बच्चू कडू यांच्या लक्षात आले होते. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांना वऱ्हाडात प्रहार पक्षाचा विस्तार करण्याची संधी मिळाली होती. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात हमखास मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा प्रहारच्या कार्यकर्त्यांना होती. खुद्द बच्चू कडू यांनी आपल्याला समाजकल्याण, अपंग कल्याण या विभागांमध्ये काम करायला आवडेल, अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. पण, त्यांचा भ्रमनिरास झाला. आता दुसऱ्या विस्तारात तरी मंत्रिपदाची संधी मिळेल का, अशी साशंकता कार्यकर्ते व्यक्त करताना दिसून येत आहेत.

हेही वाचा- अंधेरी पूर्वची शिवसेनेची विजयी जागा अखेर भाजपच लढविणार; ढाल-तलवार निवडणूक आखाड्याबाहेरच

बच्चू कडू यांची शैली ही थेट जनतेत मिसळून काम करण्याची आहे. ते जनतेशी थेट संवाद साधतात. आता सरकारमध्ये आहे, म्हणून विरोधी भूमिका घेता येत नाही. मंत्रिपद नसल्याने अधिकार देखील नाहीत. लोकांच्या प्रश्नांना उत्तरे कशी द्यायची, असा पेच त्यांच्यासमोर आहे. अने‍क ठिकाणी अतिवृष्टीग्रस्तांना सरकारची मदत मिळालेली नाही. शेतकरी अडचणीत आहेत, अशा स्थितीत त्यांना आता भूमिका घ्यावी लागणार असून बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपला आक्रमक बाणा दाखवावा, अशी अपेक्षा त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachu kadu is politically desperate as he waits for a ministerial post print politics news dpj
First published on: 15-10-2022 at 10:17 IST