मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाने उत्तर प्रदेशातील १६ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यंदा मायावती यांचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. गेल्या वेळी म्हणजेच २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाने समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोक दलाबरोबर युती केली होती. त्यावेळी बसपाने नऊ जागांवर निवडणूक लढवली होती. तसेच त्यांनी चार जागांवर विजयही मिळविला होता.

रविवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार, बहुजन समाज पक्षाने सहारणपूरमधून माजिद अली यांना उमेदवारी दिली आहे. तसेच कैरानामधून श्रीपाल सिंग, मुझफ्फरनगरमधून दारा सिंग प्रजापती, बिजनौरमधून विजेंद्र सिंग, नगीनामधून सुरेंद्र पाल सिंग, मुरादाबादमधून मोहम्मद इरफान सैफी, रामपूरमधून जीशान खान, संभलमधून शौकत अली व अमरोहमधून मुजाहिद हुसेन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा – Loksabha Poll 2024 : संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या अनंतकुमार हेगडेंना डच्चू; भाजपातर्फे उत्तरा कन्नडमधून कोणाला संधी?

त्याशिवाय मेरठमधून देवव्रत त्यागी, बागपतमधून प्रवीण बन्सल, गौतम बुद्ध नगरमधून राजेंद्र सिंग सोलंकी, बुलंदशहरमधून गिरीशचंद्र जाटव, अलोनामधून आबिद अली, पीलिभीतमधून अनिश अहमद खान ऊर्फ फूल बाबू व शाहजहांपूरमधून दोद्रम वर्मा यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

बसपाच्या यादीत सात अल्पसंख्याक उमेदवार

दरम्यान, बसपाने जाहीर केलेल्या १६ उमेदवारांच्या यादीत सात अल्पसंख्याक उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्याचा फटका इंडिया आघाडी बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. बसपाने सहारणपूर, मुरादाबाद, रामपूर, संभल, अमरोहा, अलोना व पिलिभीत येथे अल्पसंख्याक समाजातील उमेदवार उभे केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी दलित आणि मुस्लीम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

बसपाच्या यादीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पक्षाने सर्वच १६ जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. खरे तर मागील काही दिवसांत बसपाला राजकीय आव्हानांचा सामना करावा लागला आहे. विद्यमान खासदारांसह पक्षातील अनेक पक्ष सोडून गेले आहेत. शनिवारी श्रावस्तीचे खासदार राम शिरोमणी वर्मा यांना पक्षविरोधी कार्यवाही केल्याच्या आरोप करीत पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. तसेच गेल्या आठवड्यात लालगंजच्या खासदार संगीता आझाद यांनी त्यांचे पती व माजी आमदार आझाद अरी मर्दान यांच्यासह भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

हेही वाचा – भाजपा की नितीश कुमार? एनडीएतील समावेश गरज कुणाची होती? आकडेवारी काय सांगते?

त्याशिवाय या महिन्याच्या सुरुवातीला आंबेडकर नगरचे खासदार रितेश पांडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. तर, गाझीपूरचे खासदार अफजल अन्सारी यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. या दोघांनाही भाजपा आणि समाजवादी पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे उमेदवारांना तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने बसपाने एक महिन्यापूर्वीच उमेदवार जाहीर केले आहेत.