Congress Bharat Jodo Yatra : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. आज(शनिवार) या यात्रेद्वारे राहुल गांधी लुधियानाहून कपूरथलापर्यंतचा प्रवास करणार आहेत. या दरम्यान राहुल गांधींनी एक खुले पत्र लिहून देशात कायमस्वरूपी आर्थिक संकट निर्माण होण्याचा इशारा दिला आहे.

राहुल गांधींनी शुक्रवारी लोकांना केंद्रातील विद्यमान सरकारच्या काळात देशात कायमस्वरुपी आर्थिक संकट निर्माण होणार असल्याचा इशारा दिला. “देशातील जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी म्हणाले, एक स्पष्ट आर्थिक संकट निर्माण होत आहे. तरुणांमध्ये बेरोजगारी, असह्य भावनेची वाढ, गंभीर कृषी संकट आणि देशाच्या संपत्तीवर पूर्णपणे कॉर्पोरेट कब्जा. लोकांना त्यांचा रोजगार गेल्याची, उत्पन्नात घट होत असल्याची चिंता आहे. याचसोबत त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नाचाही भंग होत आहे. देशात पुन्हा एकदा निराशेचे वातावरण आहे.”

‘देशाला विभाजनवादाचा धोका असून हे घटक आपल्या वैविधपूर्ण संस्कृतीचा आपल्याच विरोधात गैरवापर करत आहेत. धर्मा-धर्माना, जाती-जातींना, भाषा-भाषांना, राज्या-राज्यांना एकमेकांविरोधात लढवले जात आहे. लोकामध्ये असुरक्षितता आणि भीती निर्माण करून एकमेकांविरोधात द्वेषाचे बीज पेरले जात आहे. पण, द्वेषाच्या राजकारणाला मर्यादा असतात. द्वेषाचे राजकारण फार काळ चालणार नाही, याची मला या यात्रेमुळे खात्री झाली आहे’, अशी आशा राहुल गांधी यांनी देशवासींना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

कन्याकुमारी ते काश्मीर अशी साडेतीन हजार किमीची ही यात्रा आता अंतिम टप्प्यामध्ये असून २६ जानेवारी रोजी काँग्रेसच्या ‘हाथ से हाथ जोडो’ या जनमोहिमेची सुरुवात होणार आहे. या जनमोहिमेच्या माध्यमातून राहुल गांधींचे पत्र घरोघरी पोहोचवले जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजांमधील द्वेष आणि मतभेदांचा देशाच्या विकासावर विपरित परिणाम होऊ लागला असल्याचे प्रत्येकाला जाणवू लागले आहे. जात, धर्म, भाषा, प्रांत यांच्यामध्ये मतभेद निर्माण करणाऱ्या घटकांवर आपण सगळे मात करू हा विश्वास वाटतो. विविधतेमध्ये ऐक्य हेच आपल्या देशाचे वैशिष्ट आहे. कोणालाही घाबरू नका, मनातील भीती काढून टाका. असे झाले तर समाजातून द्वेष आपोआप नष्ट होईल, असे राहुल गांधींनी पत्रात नमूद करत भाजप व केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली.