पुणे: महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय शक्ती पणाला लावल्याने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना अध्यक्षपदावरून माघार घ्यावी लागल्यानंतर आता पुणे जिल्ह्यावर प्राबल्य असलेल्या अजित पवार यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुुकांंमध्ये रोखण्यासाठी भाजपने मोहोळ यांनाच निवडणूक प्रभारी नेमून रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पवार विरूद्ध मोहोळ लढत होणार आहे.
भाजपने निवडणूक प्रभारी आणि निवडणूक प्रमुख यांच्या नियुक्ती जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्याचे प्रभारी म्हणून मोहोळ यांची नियुक्ती केली आहे. अजित पवार आणि मोहोळ हे दोघे महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोरासमोर उभे राहिले होते. मात्र, अजित पवार यांनी राजकीय चक्रे फिरवून मोहोळ यांना माघार घ्यायला लावली आणि अजित पवार यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला.
जैन बोर्डिंग जागेच्या प्रकरणामुळे मोहोळ यांना माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी लक्ष्य केल्यावर त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मोहोळ हे एकाकी पडल्याचे चित्र होते. हे प्रकरण मिटल्यानंतर महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदावरून माहोळ यांना माघार घ्यावी लागल्याने त्यांचे राजकीय वजन कमी होऊ लागल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी मोहोळ यांच्यावर सोपवून अजित पवार यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर अजित पवार यांचे प्राबल्य आहे. राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायती आहेत. बहुतांश ठिकाणी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अनेकजण हे अजित पवार यांच्याबरोबर राहिल्याने सध्या अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ची ताकद आहे. ही ताकद कमी करण्याचा डाव भाजपने आखला असून, पवार यांच्यासमोर मोहोळ यांना उभे केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पवार विरूद्ध मोहोळ अशी लढत होणार आहे.
अजित पवारांना रोखण्यासाठी आणखी चार शिलेदार
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाबरोबरच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका; तसेच मावळ आणि बारामती या भागात अजित पवार यांना रोखण्यासाठी भाजपने अजित पवार यांचे कट्टर विरोधक असलेल्या चार शिलेदारांची निवडणूक प्रमुख पदी नेमणूक केली आहे. पुण्यातून गणेश बीडकर, पुणे- उत्तर (मावळ) विभागाची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्याकडे, पुणे-दक्षिण (बारामती) या विभागासाठी आमदार राहुल कुल आणि पिंपरी-चिंचवड विभागाची जबाबदारी आमदार शंकर जगताप यांच्यावर सोपविली आहे. या चौघांपैकी आमदार लांडगे हे उघडपणे अजित पवार यांच्यावर टीका करत असतात. मावळ भागात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके हे आहेत. त्या ठिकाणी आता लांडगे हे या पक्षाला रोखणार आहेत. आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून दौंड, इंदापूर आणि काही प्रमाणात बारामतीत अजित पवार यांच्यापुढे आव्हान उभे केले जाणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये एकेकाळी अजित पवार यांची सत्ता होती. आमदार शंकर जगताप यांचे बंधू दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी पवार यांच्या हातातून या महापालिकेची सत्ता ताब्यात घेतली. एकेकाळी जगताप हे पवार यांच्याबरोबर होते. आता पवार आणि जगताप यांच्यात सख्य राहिलेले नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेत अजित पवार यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने आमदार शंकर जगताप यांची नेमणूक केली आहे.
पुणे महापालिकेत भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या ठिकाणी मोहोळ हे स्वत: असणार आहेत. तसेच बीडकर हेदेखील आहेत. बीडकर यांनी गेल्या पुणे महापालिका निवडणुकीतही निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहिले होते. मोहोळ यांच्याशिवाय हे चार शिलेदार अजित पवार यांना जिल्ह्यात रोखण्याचे काम कसे करणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.
