प्रथमेश गोडबोले

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून ४५ मतदार संघांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर असे दोन मतदारसंघ निश्चित केले आहेत. या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा धडाका लावण्यात आला असून भाजपच्या मिशन ‘शिरूर’ला शिंदे गटाचे बळ मिळत असल्याची चर्चा आहे.

गेल्या अडीच वर्षांत शिरूरमध्ये शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विकासकामांत डावलल्याचा आरोप सातत्याने होत होता. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना डावलून ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि भाजपकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुचविलेली विकासकामे केंद्र, राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून मार्गी लावण्यात येत आहेत. त्यामुळे बारामती जिंकण्यासाठी आणि शिरूर मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपला ‘बाळासाहेबांच्या शिवसेना’चे बळ मिळत आहे.
पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर असे लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत.

हेही वाचा: ‘भारत जोडो’ यात्रेच्या नांदेडमधील प्रतिसादानंतर अशोक चव्हाणांवरील संशयाचे मळभ दूर

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे खासदार आहेत. शिवसेनेचे आणि आता शिंदे गटातील शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करून कोल्हे निवडून आले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकासकामांत आढळराव यांना डावलल्याची चर्चा होती. याबाबतच्या तक्रारी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत शिरूरला येऊन गेले होते. मात्र, तरी देखील तक्रारी कायम राहिल्या. महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आढळराव यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.

आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आढळराव यांनी सुचविलेल्या कामांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: बैठक घेऊन प्रशासनाला कामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या मतदारसंघातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर पंचायत समितीच्या इमारत उभारणीसाठी ५० लाखांचा निधी देऊन कामाचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले. वढू बुद्रुक येथील छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळ विकास, जुन्नरमधील आदिवासी हिरडा प्रक्रिया उद्योग, बिबट्या सफारी प्रकल्प आणि श्री क्षेत्र कुकडेश्वर मंदिराचे जतन व संवर्धन आदी कामांबाबत तातडीने करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

हेही वाचा: ‘भारत जोडो’साठी अकोल्यातील बाळापूरच्या शेतकऱ्याने उभे पीक कापून जागा दिली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकताच शिरूरचा दौरा केला असून केंदूर पाबळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले आहे. तसेच केंद्रीय आदिवासीमंत्री रेणुकासिंह यांनी देखील नुकताच शिरूर लोकसभा मतदार संघाचा दौरा केला आहे. पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे मार्ग प्रकल्पाचे भूसंपादन गतीने करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे, नगर आणि नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.शिरूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीची घट्ट पकड आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ही जागा कोणाकडे जाईल, याचा निर्णय अद्याप झालेला नसला, तरी भाजप आणि ‘बाळासाहेबांची शिवसेना’ युतीने आपापली ताकद वाढविण्यासाठी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.