अलिबाग: ग्रामपंचायत निवडणूकीच्या आडून भाजपने मोर्चेबांधणीला सुरू केल्याने अलिबाग विधानसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याचे स्पष्टच होते. निवडणूकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न पक्षाने सुरू केला आहे.

कोकणात फारसे अस्तित्व नसलेल्या भाजपने विवीध पक्षातील प्रस्थापित नेत्यांना गळाला लावून पक्ष बांधणीला सुरवात केली. प्रशांत ठाकूर आणि रामशेठ ठाकूरांना पक्षात घेऊन पनवेल विधानसभा मतदारसंघ सुरूवातीला ताब्यात घेतला. यानंतर पेण मध्ये काँग्रेसच्या रवीद्र पाटील यांना पक्षात घेत पेण विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेतला. उरण मध्ये शिवसेने विरोधात बंडखोरी करून महेश बालदी यांना निवडून आणले. आता अलिबाग विधानसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे.

शेकापच्या दिलीप भोईर यांना पक्षात घेऊन मतदारसंघ बांधणीला भाजपने सुरूवात केली आहे. याचा प्रत्यय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अलिबाग दौऱ्या दरम्यान आला. महाविजय २०२४ मोहीमे आंतर्गत बावनकुळे यांनी अलिबागमध्ये शक्तीप्रदर्शन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना रायगडचा पुढचा खासदार आणि अलिबागचा पुढचा आमदार भाजपचा असेल असे स्पष्ट संकेतही दिले. दिलीप भोईर यांना आमदार हवेत की नाही असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या अलिबाग विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी पाऊल टाकण्यास सुरूवात केल्याचे स्पष्ट झाले होते.

हेही वाचा… नागपूर अधिवेशन वादळी ठरण्याची परंपरा यंदाही कायम ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचीच प्रचिती आता ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने येऊ लागली आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील एकूण ३७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. यात अलिबाग मधील १५ तर मुरूड मधील १५ आणि रोहा मधील सात ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यातील १६ ग्रामपंचायती स्वबळावर लढविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. यातील मुरुड तालुक्यातील मिठेखार ग्रामपंचायत बिनविरोध जिंकून भाजपने ताब्यात घेतली आहे. भाजपच्या या भुमिकेमुळे मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची कोंडी झाल्याचे दिसून येत आहेत. आधीच सत्तासंघर्षात शिवसेनेत दोन गट पडल्याने पक्षाची ताकद विभागली आहे. अशातच आता भाजपने एकला चलो रे चा सूर आळविण्यास सुरूवात केल्याने शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांची अडचण झाली आहे. अशातच आता शेकापने इंडीया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाशी जुळवून घेण्यास सुरवात केल्याने विरोधी पक्षांची ताकद वाढणार आहे.

अशा परिस्थितीत मतदारसंघातील भाजपच्या वाढत्या महत्वाकांक्षा शिंदे गटासाठी आणि आमदार महेंद्र दळवीसाठी आगामी काळात आव्हानात्मक ठरेल, असे मानले जाते.