नाशिक : कोणी कसाही असू द्या, त्याला पक्षात प्रवेश द्या, एखादा विरोधक टीका करत असल्यास त्याला पक्षात प्रवेश देवून त्याचे तोंड बंद करा, अशी जर एखाद्या पक्षातील मंत्र्याची भूमिका असेल तर त्या पक्षाला कालांतराने त्याचे फळ भोगावे लागू शकते. नाशिकमध्ये सध्या भाजपच्या बाबतीत हेच घडत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाची नाशिकची जबाबदारी खांद्यावर असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी मागील आठवड्यात जळगाव येथील पक्ष मेळाव्यात कोणी कसाही असला तरी त्याला पक्षात प्रवेश देण्याची सूचना केली होती. त्यावरुन विरोधकांनी टीकाही केली होती.

महाजन यांनी नाशिकमध्ये पक्ष विस्तारासाठी हीच भूमिका घेतल्याने वादग्रस्त सुधाकर बडगुजर यांच्यापासून सुनील बागूल यांच्यापर्यंत सर्वांना कवाडे उघडी करुन दिली. परंतु, सप्टेंबर महिन्यात पक्षाच्या दोन माजी नगरसेवकांना हत्या, गोळीबार प्रकरणामुळे अटक झाल्याने पक्षाचे बदलते अंतरंग जुन्या निष्ठावानांना अस्वस्थ करीत आहे. दुसरीकडे, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना यामुळे आयतेच कोलीत मिळाले आहे.

२०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यास सामोरे जाण्याची तयारी करणाऱ्या नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी सर्वांसाठी चिंतेचा विषय झाली आहे. कोयते, चाकू, सुरे, गावठी बंदुका यांचा सर्रास वापर गुन्हेगारांकडून केला जात आहे. १३-१४ वर्षांची मुलेही याबाबतीत आघाडीवर आहेत. सोनसाखळी चोर तर घरात घुसू लागले आहेत. दिवसाढवळ्या अपहरण, हत्या, लुटमार, टोळीयुध्द हे सर्वकाही आता नाशिककरांच्या इतके अंगवळणी पडले आहे की, त्याविषयी कोणी प्रतिक्रिया देणेही टाळले जात आहे. सत्ताधारी भाजपचे तीन आमदार नाशिकमध्ये असताना कोणीही वाढत्या गन्हेगारीविरुध्द पुढे आलेला नाही. त्यातच या पंधरवड्यात भाजपचे दोन माजी नगरसेवक गुन्हेगारी कृत्यामुळे पोलिसांच्या ताब्यात गेल्याने पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांची अधिकच कोंडी झाली आहे.

पंचवटीतील राहुल धोत्रे या युवकाचा हाणामारीत मृत्यू झाल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक उध्दव निमसे यांच्या काही समर्थकांना अटक करण्यात आली होती. परंतु, निमसे हे तेव्हांपासून फरार होते. अटक टाळण्यासाठी देशभर देवदर्शन करुनही कोणताच उपयोग न झाल्याने अखेर मागील आठवड्यात घटनेच्या २४ दिवसानंतर ते पोलिसांना शरण आले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा भाजपसाठी धक्का मानला जात असताना रविवारी भाजपचे अजून एक माजी नगरसेवक जगदीश पाटील यास पोलिसांनी अटक केली. सराईत गुन्हेगारांशी संबंध आणि गोळीबाराचा कट रचण्यात सहभाग असल्याच्या संशयावरुन ही अटक करण्यात आली. पंचवटीतील फुलेनगरात काही दिवसांपूर्वी सागर जाधव या सराईतावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात जाधव गंभीर जखमी झाला. या प्रकरणात पोलिसांनी ११ संशयितांना अटक केली. निकम आणि उघडे टोळ्यांमधील पूर्ववैमनस्याची किनार या हल्ल्यामागे असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणाशी जगदीश पाटील यांचा संबंध उघड झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेने (उध्दव ठाकरे) हकालपट्टी केलेले वादग्रस्त सुधाकर बडगुजर आणि सुनील बागूल, मामा राजवाडे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी कलंकित नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यास जाहीरपणे विरोध केला होता. परंतु, त्यांची बिल्कूलही दखल न घेता धुमधडाक्यात प्रवेश सोहळे पार पडले. गिरीश महाजन यांच्या आग्रहामुळे पक्षाची बदलणारी प्रतिमा पक्षासाठीच त्रासदायक ठरण्याची भीती जुन्या निष्ठावंतांकडून व्यक्त होत असताना पक्ष नेतृत्वच दखल घेत नसल्याने जुन्या निष्ठावानांनी आता अशा घटनांविषयी प्रतिक्रिया देणेही बंद केले आहे. महापालिका निवडणूक प्रचारात विरोधकांना मात्र यामुळे आयताच मुद्दा मिळाला आहे.

दोषींवर निश्चितच कारवाई – गिरीश महाजन

गोळीबार प्रकरणात अटक झालेले जगदीश पाटील हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. या प्रकरणात कोणाला वाचविण्याचा प्रयत्न नाही. जे दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल, असे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. उपरोक्त घटना कोणी केली, कशामुळे केली, याबद्दल चौकशी सुरू आहे. मुळात अशा गोष्टी घडताच कामा नयेत. त्याचे कोणी समर्थन करीत नाही, असेही महाजन यांनी नमूद केले.