नांदेड : शंकरराव चव्हाण-शरद पवारांपासून ते सध्याचे देवेन्द्र फडणवीस यांच्यापर्यंतच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी आपल्या स्वीय साहाय्यकांना राजकीय संधी देत आमदारकी मिळवून दिली, पण आम्ही एका माजी मुख्यमंत्र्यांकडे दीर्घकाळ सेवा केली, त्यांच्या कठीण काळात साथ दिली; तरी चलतीच्या काळात त्यांनी आम्हाला दूर फेकल्याची भावना व्यक्त केली आहे.

वरील खंत व्यक्त केली आहे, नांदेडच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांकडे सेवा बजावलेल्या वैजनाथ जाधव यांनी. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे तर २५ वर्षांहून अधिक काळ राहिलेलेे जाधव चव्हाण यांच्या राजकीय वाटचालीतील (१९९० ते २०१५) या महत्त्वाच्या कालखंडातले जवळचे साक्षीदार असून चव्हाणांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांना विशेष कार्य अधिकारी करण्यात आले होते; पण नंतर त्यांना चव्हाणांच्या आस्थापनेतून दूर लोटण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने अमरावतीच्या संजय खोडके यांना नुकतीच विधान परिषदेवर संधी दिल्यानंतर ‘आणखी एक पी.ए. आमदार झाला’ अशी भावना व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर कोरडे ओढले आहे.

विधान परिषदेतल्या या घडामोडींपूर्वी फेब्रुवारी महिन्यात नांदेडमध्ये झालेल्या एका कौटुंबिक कार्यक्रमात अशोक चव्हाण व त्यांच्या इतर सहकार्‍यांसमोरच वैजनाथ जाधव यांनी आपल्या मनातील अनेक दिवसांपासूनची खदखद उघड केली होती. त्याच्या काही महिने आधी त्यांनी आपली एक खंत समाजमाध्यमांतूनही व्यक्त केली. त्यातूनच महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी आपल्या स्वीय साहाय्यकांना दिलेल्या संधीचा तपशील समोर आला.

५० वर्षांपूर्वी शंकरराव चव्हाण यांचे सचिव राहिलेले रायभान जाधव यांच्यापासून झाली. त्यांना आधी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष करण्यात आले आणि मग विधानसभेची उमेदवारी देऊन काँग्रेसचे आमदारही करण्यात आले होते. जाधव यांच्या अकाली निधनानंतर पुढे त्यांच्या पत्नी आणि मुलगाही आमदार झाला.

विद्यमान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी तर अभिमन्यू पवार आणि सुमीत वानखेडे यांना आमदार केले. तर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे बहुचर्चित साहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेवर आणले. खान्देशातील भुसावळचे आमदार संजय सावकारे हे दोन दशकांपूर्वी तत्कालीन आमदारांचे पी.ए. होते. २००९ साली हा मतदारसंघ राखीव झाल्यावर तेथे सावकारे यांना संधी मिळाली आणि सलग चारवेळा निवडून आल्यावर आज ते भाजपातर्फे मंत्री झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैजनाथ जाधव यांनी वरील सर्व दाखले देत, अशोक चव्हाण यांच्या सत्ताकाळात त्यांच्यासोबत काम करणार्‍यांना राजकीय संधी देण्यात आली नाही, याबद्दल खंत व्यक्त केली. १९८९ साली चव्हाण लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यावर नांदेडमधील अनेक राजकीय सहकार्‍यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली होती, पण आम्ही त्यांची साथ सोडली नाही, असे जाधव सांगतात. चव्हाणांच्या अधिपत्याखालील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत भागभांडवल गोळा करण्याच्या प्राथमिक प्रक्रियेत जाधव यांचे मोठे योगदान होते. पण या कारखान्याच्या सभासदत्वापासून मलाच वंचित ठेवल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे पी.ए. राहिलेल्या लक्ष्मणराव हस्सेकर यांना शंकररावांनी एक साखर कारखाना मंजूर करून दिला, पण अशोक चव्हाणांची सेवा करणार्‍या जाधव व इतरांच्या वाट्याला उपेक्षाच आली.