छत्रपती संभाजीनगर: भाजपने पक्ष स्थापनेपासून ठरवलेल्या सूत्रानुसार ‘माधवं’ केंद्रीत प्रचार हाताळणारा चेहरा म्हणून गोपीनाथ मुंडेंचे नेतृत्त्व पुढे आणले. मुंडेंच्या निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडेंऐवजी भाजपने अन्य पर्याय चाचपडून बघितले. मात्र, ‘मुंडे’ आडनावाशिवायचे सूत जुळून येत नसल्याचे लक्षात येताच आता पुन्हा एकदा पंकजा यांना राष्ट्रीय स्तरावर ‘माधवं’चे सूत्रे हाताळणारा पक्षातलाच मूळ चेहरा म्हणून समोर आणले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंबाजोगाईतील सभा, त्यातील ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवण्याचे ग्वाही देणारे भाषण आणि सोबतीला गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी यामाध्यमातून ‘माधवं’ मतपेढीची सूत्रे पुन्हा पंकजा मुंडेंकडे असतील याला बळ देणारे म्हणूनच पाहिले जात आहे.

हेही वाचा : बसपा अध्यक्ष मायावती यांचा पुतण्या आकाश आनंद नेमका कोण?

माळी, धनगर व वंजारी (माधव) समाजाची एक मतपेढी बांधण्याचे सूत्र वसंतराव भागवत यांनी मांडले आणि त्याला प्रत्यक्षात मूर्त रुप दिवंगत गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांनी दिले. बीडमध्ये माधवंचे यशस्वी प्रारुप निर्माण करून मुंडेंनी त्याचा विस्तार राज्यभर केला. माधवंची सूत्रे मुंडे हयात असेपर्यंत त्यांच्याच हाती होती. मुंडेंच्या निधनानंतर माधवंची सूत्रे पंकजा मुंडेंनी स्वत:कडे येतील, यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांचे चुलत भाऊधनंजय मुंडेंकडून विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव, पक्ष पातळीवरून वंजारा समाजातून अन्य नेतृत्त्व पुढे आणण्यासाठी झालेले प्रयत्नाचा भाग म्हणून डाॅ. भागवत कराड यांना केंद्रात राज्यमंत्रीपद देण्यात आले. लातूरमधील रमेश कराड यांना दिलेली विधान परिषदेवरील संधी, याकडे पंकजा यांचे महत्त्व आणि ‘माधवं’वरील पकड जाणीवपूर्वक कमी करण्याचाच एक भाग असल्याच्या नजरेने पाहिले गेले. त्याच अंगाने त्याची चर्चा राज्यभर झाली. दोन्ही कराडांना संधी देण्याचा वंजारी समाजावर फारसा परिणाम दिसून आला नाही. मात्र, पंकजा मुंडे यांना अडगळीत ठेवण्याच्या भाजपतील हालचालींमुळे वंजारी समाजात चांगलीच नाराजी पसरत गेली. परिणामी भाजपविषयी वंजारी समाजात एक रोष रूजू लागला होता. पर्यायाने ‘माधवं’मधील वंजारी या घटकाची वीण सैल होत असल्याचे दिसू लागले. याच दरम्यान ‘माधवं’मधील वीण विस्कटणार नाही यासाठी पंकजा मुंडेंना राष्ट्रीय स्तरावर पक्ष संघटनेत स्थान दिले गेले. त्यावरही पंकजा मुंडेंना राज्यस्तरावरील राजकारणातून दूर करण्याचाच विचार असल्याची चर्चा खासी रंगली. मात्र, लोकसभा निवडणुकीत डाॅ. प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यामागची कारणे त्यांची ओबीसी नेता म्हणून असणारी प्रतिमा. त्यातही महिला नेतृत्वपुढे आणण्याचाही विचार हा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणात लागू होऊ शकणाऱ्या ५० टक्के महिला आरक्षणाशी संदर्भाने जोडला जात आहे.

हेही वाचा : गोध्रा जळितकांड: मोदींची लालूंवर टीका; नेमका कोणत्या समितीचा उल्लेख केला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यादृष्टीने भाजपकडे राष्ट्रीय राजकारणात हिंदीसह इंग्रजीही भाषेवर प्रभुत्त्व असलेला महिला चेहरा आणि तोही ओबीसी प्रवर्गातील असणे गरजे मानूनच पंकजा मुंडे यांना पुढे आणून त्यांच्याकडे ‘माधवं’ची सूत्रे सोपण्याचे संकेत मिळत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अंबाजोगाईतील सभेतील विधानांकडेही त्याच राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.