सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची जाहीर सभा येत्या सोमवारी औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात होणार आहे. एका अर्थाने हा प्रचाराचा शुभारंभ असल्याचे असल्याचा दावा शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी केला. या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती असणार आहे. युतीमध्ये असणाऱ्या राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांत स्वतंत्र संघटन उभे करण्यासाठी भाजपच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या सभेचे आयोजन केले जात आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात विजय मिळावा, यासाठीची रणनीती ठरविण्यासाठी कोअर कमेटीच्या बैठका घेणार असून शहरातील काही महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी ते घेतील. दुपारी चारनंतर ही सभा होणार आहे. थेट जाहीर सभा घेत लोकसभा प्रचाराचा बिगुलच औरंगाबादमधून वाजेल असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: “मी विचार करतोय राजकीय संन्यास घ्यावा”, अजित पवारांचं विधान चर्चेत; चंद्रशेखर बावनकुळेंना दिलं प्रत्युत्तर!

पदवीधर मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर वर्ष-दीड वर्षे जाहीर कार्यक्रमांना हजेरी न लावणारे शिरीष बोराळकर यांना भाजप जनता पक्षाने शहराध्यक्ष केल्यानंतर गेल्या ४०-४२ दिवसांत अनेक कार्यक्रम घेतले असल्याचा दावा त्यांनी केला. गेले काही दिवस जाहीर कार्यक्रमांना नव्हतो, असेही बोराळकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात मान्य केले. अनेक वर्षे विविध पदांवर काम करत असल्याने अनुभवी व्यक्तींचा पक्षाने उपयोग करून घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे त्याचा फायदा होईल असे वाटते, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: अमित साटम : व्यवस्थापन क्षेत्राकडून राजकारणाकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

औरंगाबाद लाेकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची पेरणी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून यासाठी स्वतंत्र यंत्रणाही लावली जात आहे. या पूर्वी लोकसभा मतदारसंघातील राजकीय इतिहास, जातनिहाय आकडेवारी, कोणते मुद्दे-समस्या आहेत, याचाही अभ्यास भाजपच्या चमूने केला आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील धार्मिक ध्रुवीकरण आणि त्याला असणारे जातीय पदर यामुळे औरंगाबाद येथून प्रचाराचा बिगुल वाजविण्याचे नियोजन केले असावे, असा अंदाज बांधला जात आहे.