सांगली : महापालिका निवडणुकीबरोबरच नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महायुती विरूध्द महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची राज्य पातळीवर चर्चा होत असली तरी स्थानिक पातळीवर राजकीय अस्तित्वासाठी युती, आघाडीला वळचणीला टांगून राजकीय घोडे दामटण्याचा प्रयत्न होणार हे निश्चित. विटा नगरपालिका निवडणुकीत महायुतीमधील भाजप विरूध्द शिवसेना शिंदे यांच्यातच रंगतदार सामना होण्याची चिन्हे आहेत. माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हे भाजपमध्ये असले तरी त्यांचा राजकीय संघर्ष शिवसेनेचे आमदार सुहास बाबर, अमोल बाबर यांच्याशी होणार आहे. यामुळे महायुतीच्या एकसंघपणाला पहिला उंबरा विट्यातच लागणार आहे.
दोन दिवसापुर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विटा शहरात जाउन बाबर यांच्या विट्याचा राजा या गणेश मंडळास भेट देउन जर सर्व जण एकाच दिशेने प्रयत्न करतील तर मतदार संघाचा गतीने विकास होउ शकतो असे सांगत बाबर गटाला पाटील गटाशी जुळवून घेण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला. मात्र, बाबर आणि पाटील यांच्यात आतापर्यंत उभा दावा पाहण्याची सवय असलेल्या मतदार संघाला हा सल्ला मान्य होण्यासारखा खचितच नाही. दोन्ही गटाकडून महायुतीऐवजी भाजप विरूध्द शिवसेना अशीच लढत होण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.
शिंदे सेनेची ताकद प्रामुख्याने खानापूर मतदार संघातच एकवटली असून आमदार सुहास बाबर यांचा गट विटा नगरपालिका निवडणुकीत एकला चलो रेच्या भूमिकेत सध्या तरी आहे. महायुतीने एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला तरी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हे भाजपमध्ये सहभागी झाले असले तरी, गेल्या चार दशकापासून विटा नगरपालिकेवर असलेले वर्चस्व सोडण्यास ते सहजासहजी राजी होतील असे नाही, तर बाबर गटाला विटा नगरपालिकेच्या सत्तेत जायचे असून आमदार बंधू अमोल बाबर यांच्यासाठी नगरपालिका हे एकमेव सत्ताकेंद्र महत्वाचे वाटत आहे. यामुळे या मतदार संघात महायुतीमध्ये दुही निश्चित मानली जात आहे. तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि बाबर गटाचे फारसे सख्य नाही. यामुळे खानापूरची शिवसेना भाजपच्या तंबूत जाण्यास राजी होण्याची शक्यता दुर्मिळ दिसत आहे. पाटील व बाबर गटाने नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
विटा नगरपालिकेवर पाटील गटाचीच आतापर्यंत सत्ता राहीली आहे, तर पंचायत समितीमध्ये बाबर गटाचे प्राबल्य राहिले आहे. जसे विटा शहरात बाबर गटाला आपले वर्चस्व निर्माण करता आले नाही, तसेच पाटील गटाला ग्रामीण भागात फारसे पाठबळ मिळालेले नाही. यामुळे हा पाटील-बाबर गटाचा वाद धुमसतच राहिला आहे.
बाबर गटाची ताकद कमी करण्यासाठी पाटील गटाने वेगवेगळे राजकीय संंबंध प्रस्थापित केले. यशवंत कारखान्याच्या मालकीवरून तत्कालिन खासदार संजयकाका पाटील यांच्याशी जुळवून घेतले, याबद्दल मतदार संघात समाविष्ट असलेल्या विसापूर (ता. तासगाव) मंडळातील कुमक मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आटपाडीत जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी मदत केल्याने बाबर गटाचे पारडे मतदार संघात जडच राहिले. टेंभू योजनेच्या पाण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न पाटील गटाने केला, मात्र, पाणीदार आमदार कोण असा सवाल करत बाबर गटानेही प्रत्युत्तर दिले. आता नगरपालिका निवडणुकीत या बाबी महत्वाच्या नसल्या तरी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी महत्वाच्याच ठरणार आहेत. पाटील गटानेही नगरपालिकेला देशपातळीवरील स्वच्छतेचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळवले आहे. यामागे या गटाचे प्रशासकीय कौशल्य तर दिसले. याचबरोबर विट्यात राजकीय ताकद असलेले अशोक गायकवाड, गंगाधर लकडे, किरण तारळेकर, चोथे ही मंडळी काय भूमिका घेतात हेही महत्वाचे ठरणार आहे.
विट्यात महायुती महाविकास आघाडीच्या तुलनेत प्रबळ आहे हे मान्यच करावे लागेल. महायुती प्रबळ असली तरी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वैभव पाटील मुंबईत एका पंगतीला असले तरी शहरात आणि मतदार संघात दोन पंगतींची गरज राजकीय अस्तित्वासाठी आवश्यकच आहे. याशिवाय आमदार पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर हेही आपली राजकीय शक्ती वाढविण्याच्या प्रयत्नात असल्याने त्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. आमदार बाबर यांना आपले राजकीय वर्चस्व राखण्यासाठी विटा नगरपालिका महत्वाची जशी वाटते तशीच वैभव पाटील यांनाही राजकीय अस्तित्वासाठी नगरपालिका महत्वाचीच वाटणार आहे. यामुळे महायुतीत दोन्ही मित्र पक्ष असले तरी विटा नगरपालिकेच्या मैदानात हे दोन्ही गट आमने सामने येणार हे निश्चितच मानले जात आहे.