सावंतवाडी: विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दीपक केसरकर यांच्या विरोधात बंडखोर करणाऱ्या विशाल परब यांना भाजपने पक्षात पुन्हा प्रवेश देऊन बळ दिले आहे. परब यांचे निलंबन रद्द करून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला. या सर्व घडामोडी खासदार नारायण राणे यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विशाल परब हे खासदार नारायण राणे यांच्यासोबत काम करत होते. मात्र, नंतर त्यांचे राणेंशी मतभेद झाले आणि ते तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत काम करू लागले. निवडणुकीच्या वेळी परब यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची आशा होती, पण महायुतीमध्ये सावंतवाडीची जागा शिवसेनेला (शिंदे गट) गेल्याने विद्यमान आमदार दीपक केसरकर यांना उमेदवारी मिळाली.

यामुळे नाराज झालेले परब यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजप नेत्यांनी, विशेषतः तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण परब आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांवर, विशेषतः रवींद्र चव्हाण यांच्यावर, केसरकर यांना विजयी करण्याची जबाबदारी वाढली.

या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही भाजपची ताकद आमदार केसरकर यांच्या मागे उभी केली. एकेकाळी त्यांच्यासोबत असलेले राजन तेली आणि विशाल परब यांना राणेंनी फटकारले. अखेरीस, महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी ८१,००८ मते मिळवून चौथ्यांदा विजय मिळवला. त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन तेली (४१,१०९) आणि बंडखोर विशाल परब (३३,२८१) मते मिळाली.

निवडणुकीदरम्यान भाजपने परब यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. गेल्या आठ महिन्यांपासून ते शांत असले तरी त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे आल्यानंतर परब यांची घरवापसी निश्चित झाली. आणि आता त्यांचे निलंबन अधिकृतपणे मागे घेण्यात आले आहे. विशाल परब हे रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

या घडामोडींमध्ये रवींद्र चव्हाण यांनी परब यांना ‘अभय’ दिल्याचे दिसून येत आहे. मात्र, खासदार नारायण राणे या प्रकरणापासून दूर आहेत अशी चर्चा आहे. त्यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पालकमंत्री नितेश राणेे हे देखील यावेळी अनुपस्थित होते. त्यामुळे, आता पुढे राणे यांची भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.