ठाणे : राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच ठाणे शहरात मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन होत असून, या आंदोलनांना भाजपसह ठाकरे गटाचे बळ मिळताना दिसून येत आहे. या आंदोलनातील भाजपच्या सहभागामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. यानिमित्ताने भाजपाची नेमकी भूमिका काय, असा सवाल शिंदे गटाचे नेते उपस्थित करत आहेत.
राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलने तीव्र झाली असून, नेत्यांना गावबंदीचे लोण अनेक जिल्ह्यांत पसरले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. अशाचप्रकारे ठाण्यात मराठा समाजाच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात साखळी उपोषण सुरू केले आहे. यामध्ये भाजपचे पदाधिकारी रमेश आंब्रे, शिवसेना (उबाठा) महिला विभाग प्रमुख ज्योती कदम, विभाग प्रमुख रमेश शिर्के, युवा अध्यक्ष किरण जाधव आणि खासदार राजन विचारे यांचे स्वीय सहायक अभिषेक शिंदे, मराठा क्रांती मोर्चाचे दत्ता चव्हाण, मराठा सेवा संघाचे मंगेश आवळे हे सहभागी झाले होते.
भाजप आमदार निरंजन डावखरे यांचे समर्थक म्हणून रमेश आंब्रे हे ओळखले जातात. ते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असून त्यांची पत्नी स्नेहा आंब्रे या भाजपच्या माजी नगरसेविका आहेत. यापूर्वी आरक्षण मागणीसाठी बंद पुकारण्यात आला होता, त्यावेळी आंब्रे हेच नेतृत्व करत होते. त्यांच्यासोबत भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील हेसुद्धा आंदोलनात सहभागी झाले होते. मराठा समाजाचा मोर्चा असल्याने त्यात सहभागी झाल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थान परिसरात साखळी उपोषण करण्यासाठी मराठा समाजाने परवानगी मागितली होती. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर शिंदे यांच्या निवासस्थान परिसरात शुक्रवारी समाजाच्या नेत्यांनी घोषणाबाजी केली होती. त्यातही भाजपचे पदाधिकारी रमेश आंब्रे, महेश कदम हे आघाडीवर होते. महेश कदम यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला होता. ते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. एकूणच ठाणे शहरात मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन होत असून, या आंदोलनांना भाजपसह ठाकरे गटाचे बळ मिळताना दिसून येत आहे.
ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मराठा समाजाच्या नेत्यांनी शनिवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. या दरम्यान ‘सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय’ अशा घोषणा देण्यात आल्या. त्यात भाजप पदाधिकारी आघाडीवर होते. यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. यानिमित्ताने भाजपची नेमकी भूमिका काय असा सवाल खाजगीत शिंदे गटाचे नेते उपस्थित करत आहेत.
हेही वाचा – बुलढाणा : सावकारी जाचाने विवाहितेची आत्महत्या; त्रास असह्य झाल्याने उचलले टोकाचे पाऊल
ठाण्यातील मराठा आरक्षण आंदोलनात भाजपच्या नेत्यांच्या सक्रिय सहभागाबाबत भाजपचेच नेते अधिक बोलू शकतील. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमचीसुद्धा इच्छा असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरक्षण मिळवून देतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. – नरेश म्हस्के, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते
गेल्या १५ वर्षांपासून मराठा समाजाचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्यासोबत समाजाचे काम करत आहे. आता भाजप पक्षात जरी असलो तरी आम्ही पक्ष म्हणून नव्हे तर मराठा समाज म्हणून एकत्र येऊन आंदोलन करत आहोत. या आंदोलनात सर्वच पक्षांचे नेते सहभागी होत आहेत. – रमेश आंब्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष