मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाने आता मुंबईत मात्र ही जबाबदारी आणि अधिकार मुंबई महापालिका आयुक्तांवर सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई महापालिका आयुक्तांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंची सोनिया गांधींशी चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी विधानसभा निवडणूक ही मुंबई महापालिका आयुक्तांना पार पाडावी लागणार आहे. देशभरात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी प्रामुख्याने जिल्हाधिकारी यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोषित करण्यात येते. मात्र, चेन्नई आणि बेंगळूरु या शहरामध्ये सर्व कारभार महापालिकांच्या अखत्यारित येत असल्याने तेथे निवडणुकांची जबाबदारी आणि अधिकार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महापालिका आयुक्तांवर सोपविण्यात आले आहेत. या दोन्ही शहरात उपक्रम यशस्वी ठरलेला हा उपक्रम आता मुंबईतही राबविण्यात येणार आहे. मुंबईत शहर जिल्हा आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करण्यात आले असून आजवर तेच निवडणुका घेत होते. मात्र, मुंबईत सर्व यंत्रणा पालिकेकडे असल्याने निवडणुका घेताना जिल्हाधिकाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांकडे देण्यात आली असून तशी अधिसूचना निवडणूक आयोगाने काढली आहे.