आंध्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांची कन्या वाय. एस. शर्मिला यांची नियुक्ती करण्यात आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी विरुद्ध त्यांची बहीण शर्मिला यांच्यात सामना होणार आहे. काँग्रेसला सत्ता मिळाल्यास शर्मिला हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल, असेच संकेत आहेत.

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेस सोडल्यावर वायएसआर काँग्रेसची स्थापना केली तेव्हा त्यांची बहीण शर्मिला यांनी त्यांना साथ दिली होती. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जगनमोहन यांना अटक झाल्यावर पक्षाची सूत्रे शर्मिला यांनी हाती घेतली होती. भावाला अटक झाल्यावर बहीण शर्मिला यांनी आंध्रमध्ये पदयात्रा काढून वातावरणनिर्मिती केली होती. २०१९च्या निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला बहुमत मिळाले. जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्यात व बहीण शर्मिला यांच्यात दुरावा निर्माण झाला. शर्मिला यांनी नंतर वायएसआर तेलंगणा काँग्रेस पक्षाची स्थापना केली. जगनमोहन आंध्र तर शर्मिला तेलंगणात आपले वर्चस्व निर्माण करतील अशी शक्यता वर्तविली जात होती. पण शर्मिला यांना तेलंगणात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच नवी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्यावर शर्मिला यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता.

हेही वाचा – नगरमध्ये भाजपमधूनच विखे-पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नापसंती

कर्नाटक आणि तेलंगणात सत्ता मिळाल्याने काँग्रेसच्या आंध्र प्रदेशातही आशा पल्लवीत झाल्या आहेत. लोकसभेबरोबरच आंध्रमध्ये विधानसभेची निवडणूक होईल. माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांची पुण्याई अजूनही कायम आहे. जगनमोहन रेड्डी सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. याचाच फायदा उठविण्याकरिता काँग्रेस पक्षाने वाय. एस. राजशेखर रेड्डी यांची कन्या शर्मिला यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तत्पूर्वी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राजू यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली.

आंध्रमध्ये सत्ताधारी जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस, तेलुगू देशम आणि जनसेना पार्टी यांची आघाडी, काँग्रेस अशी तिरंगी लढत अपेक्षित आहे. भाजपही रिंगणात असला तरी आंध्रमध्ये भाजपची फारशी पाळेमुळे रोवली गेलेली नाहीत. आंध्रमध्ये यंदा चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देशम आणि चित्रपट सूपरस्टार पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टी यांच्या युतीचे आव्हान आहे. या दोन पक्षांबरोबरच भाजपनेही युती करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

हेही वाचा – पुण्यात काँग्रेसकडून कसब्याच्या पुनरावृत्तीसाठी धंगेकरांना उमेदवारी ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्राबाबू नायडू हे आंध्रतील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या कम्मा या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. जनसेना पार्टीचे प्रमुख पवन कल्याण हे कप्पू समाजाचे आहेत. आंध्रच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे २५ टक्के लोकसंख्या ही कप्पू समाजाची आहे. जगनमोहन रेड्डी व शर्मिला हे ख्रिश्चन आहेत. आंध्रतील आगामी निवडणूक ही जातीच्या आधारावर होईल अशीच चिन्हे आहेत.