बुलढाणा : जिल्ह्यातील सातही मतदारसंघांत मोठ्यासंख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये लहान अपरिचित पक्ष आणि अपक्षांचा मोठा भरणा आहे. एकूण चित्र पाहता, यातील बहुसंख्य अपक्षांची ‘पेरणी’ करण्यात आली असल्याचे मानले जाते. यामध्ये महाविकास आघाडीचे मतदान समजल्या जाणाऱ्या विशिष्ट समुदायातील कार्यकर्त्यांचा जास्त भरणा आहे. महाविकास आघाडीचे मतविभाजन व्हावे, यादृष्टीने हे छुपे डावपेच आखण्यात आल्याची राजकीय शंका वर्तविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील सात जागांसाठी तब्बल १९९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. एरवी अर्जाच्या छाननीत मोठ्या संख्येने अर्ज बाद होतात. मात्र यंदा केवळ १२ अर्ज बाद झाले असून १८७ अर्ज वैध ठरले आहे. यातील बहुतेकांना ‘पाठबळ’ असल्याची शंका वर्तवण्यात येत आहे.

आणखी वाचा-Rohit Patil: तासगावमध्ये चार ‘रोहित पाटील’ रिंगणात

मलकापूर मतदारसंघात २२ उमेदवार रिंगणात असून यामध्ये १४ अपक्ष आहेत. वंचित बहुजन आघाडीने येथून अल्पसंख्याक समुदायातील उमेदवार दिला असून याच समुदायातील ७ अपक्ष मैदानात आहेत. बुलढाण्यात २१ उमेदवार असून त्यात १३ अपक्ष आहेत. वंचितने ऐनवेळी सदानंद माळी यांच्याऐवजी प्रशांत वाघोदे यांना उमेदवारी दिली. चिखलीमध्ये तब्बल ४२ उमेदवार रिंगणात असून यात तब्बल २४ अपक्ष आहेत. अल्पसंख्याक समुदायातील ८ जण मैदानात आहेत. सिंदखेड राजात एकूण ३५ उमेदवारांपैकी २७ अपक्ष असून त्यात अल्पसंख्याक समुदायातील ६ जण आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव मेहकरमधील ३० पैकी २०, खामगाव २२ उमेदवारांत १०, तर जळगावमध्ये १५ पैकी ९ अपक्ष उमेदवार आहेत.

आघाडीसाठी डोकेदुखी

दुसरीकडे, सातही मतदारसंघात लहान पक्षांचे उमेदवार चळवळीतील कार्यकर्ते आहेत . मेहकर वगळता सहा मतदारसंघांत अल्पसंख्याक समुदायातील उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. या बाबी महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहे. या उमेदवारांमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फटका आघाडीच्या सातही उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. लढतीतील तीव्र चुरसमुळे निकाल कमी फरकाने लागण्याची दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता आघाडीचे उमेदवार आणि पदाधिकारी यांनी उपद्रवी ठरू शकणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. माघारीच्या अंतिम मुदतीत ४ नोव्हेंबरपर्यंत त्यांचे प्रयत्न कितपत यशस्वी ठरतात, हा मुद्दादेखील निकालात महत्त्वाचा ठरणार आहे.

आणखी वाचा-सोलापुरात बालेकिल्ला राखण्यासाठी भाजप राष्ट्रवादीत चुरस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन शिंगणे, दोन शेळके

नावात काय? असे एका साहित्यिकाचे विधान अनेकदा वापरले जाते. मात्र, बहुतेक निवडणुकांत उमेदवारांच्या नावावर लढत, निकाल ठरतो, हे वास्तव आहे. यामुळे अपक्षांप्रमाणेच यंदा ‘नाव साध्यर्म’ चे नवीन डावपेचदेखील वापरण्यात आले आहे. बुलढाणा मतदारसंघात आघाडीकडून जयश्री सुनील शेळके (शिवसेना ठाकरे गट) या रिंगणात आहेत. याच मतदारसंघात जयश्री रवींद्र शेळके या अपक्ष म्हणून उतरल्या आहेत. त्यांनी माघार घेतली नाही तर उमेदवारांच्या यादीत दोन जयश्री शेळके राहतील. असाच फंडा सिंदखेड राजात वापरण्यात आला आहे. तो कदाचित योगायोग पण असू शकतो. तिथे आमदार राजेंद्र भास्करराव शिंगणे हे आघाडीचे उमेदवार आहेत. अपक्ष म्हणून राजेंद्र मधुकर शिंगणे यांनी अर्ज दाखल केला आहे. ते मैदानात कायम राहिले तर मतदान यंत्रावर दोन राजेंद्र शिंगणे राहतील.