Andhra Pradesh CM Chandrababu Naidu Government : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामागचं कारण म्हणजे, महिलांच्या सुरक्षितेच्या मुद्द्यावरून राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेसने सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं आहे. आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यात एका १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. तर श्री सत्य साई जिल्ह्यातही एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याच मुद्द्यांना हाताशी धरून वायएसआर काँग्रेसने सरकारवर टीकेची झोड उठवली असून चंद्राबाबू नायडूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

विरोधीपक्षाची आक्रमक भूमिका लक्षात घेता मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्या निवासस्थानी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्याला हादरवून टाकणाऱ्या या दोन्ही घटनांची तातडीने चौकशी पूर्ण करून पीडिता आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले आहेत.

पहिली घटना : १४ वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या

३ जून रोजी अनंतपूरमधील १४ वर्षांची मुलगी शीतपेय विकत घेण्यासाठी घराबाहेर पडली. बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा शोधाशोध केली असता, दोन दिवसांनी एका शाळेच्या पाठीमागे तिचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत १० जून रोजी एका फरशी कामगाराला अटक केली. आरोपी हा मुलीच्या घराशेजारीलच असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. अनंतपूरचे पोलीस अधीक्षक पी. जगदीश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी के. नरेश (वय २७) हा विवाहित असून त्याचे मृत अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमसंबंध होते.

Chandrababu Naidu government in trouble (PTI Photo)
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (पीटीआय फोटो)

३ जून रोजी संध्याकाळी त्या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर नरेशने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली. इतकंच नाही तर, त्याने मुलीचा मृतदेह गोणीत भरला आणि तो मोटारसायकलवरून एका शाळेजवळ नेऊन जाळून टाकला. अल्पवयीन मुलीची बलात्कार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अनंतपूरमध्ये मोठा जनआक्रोश उसळला. पीडितेच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पोलीस निरीक्षक राजेंद्रनाथ यादव यांना निलंबित करण्यात आले.

आणखी वाचा : भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या ज्येष्ठ नेत्याची पक्षातून हकालपट्टी; नेमकं काय आहे कारण?

दुसरी घटना : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची दुसरी घटना श्री सत्य साई जिल्ह्यात घडली, जिथे सहा आरोपींनी पीडितेला धमकावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. इतक्यावरच न थांबता त्यांनी अत्याचार करतानाचे फोटो आणि व्हिडिओही काढले. गेल्या तीन महिन्यांपासून हे सहाही आरोपी पीडितेवर बलात्कार करीत होते. यादरम्यान पीडिता गर्भवती राहिल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना अटक केली आहे. इतर तिघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

विरोधकांनी नायडू सरकारला कसं घेरलं?

  • मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेऊन आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
  • वायएसआर काँग्रेसने बलात्काराची ही दोन्ही प्रकरणं उचलून धरली असून सरकारवर टीका करीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे.
  • वायएसआर काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा वरुडू कल्याणी यांनी राज्य सरकारवर हे महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप केला.
  • राज्यात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले असून काही ठिकाणी रक्षकच भक्षक बनत आहेत, असं कल्याणी यांनी म्हटलं आहे.
  • केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाने काही होणार नाही. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींचा तिसरा कार्यकाळ; आव्हानांमुळे आगामी काळात दिशा बदलणार?

“महिलांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलने करू”

दुसरीकडे वायएसआर काँग्रेसच्या नेत्या आर. के. रोजा यांनी असा आरोप केला की, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारच्या काळात राज्यात मद्य आणि अमली पदार्थांची दारोदार विक्री सुरू आहे. यामुळेच राज्यातील महिलांवर बलात्कार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. दरम्यान, राज्यातील विरोधी पक्षनेते बोट्सा सत्यनारायण यांनी सांगितले की, महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही तीव्र आंदोलने करू, जोपर्यंत न्याय मिळणार नाहीत, तोपर्यंत आमची आंदोलने चालूच राहणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्राबाबू नायडूंनी पोलिसांना काय आदेश दिले?

मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी राज्याचे मुख्य सचिव के. विजयानंद, पोलिस महासंचालक हरीश कुमार गुप्ता, गुप्तचर विभाग प्रमुख महेश चंद्र लड्डा यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी असे आदेश त्यांनी दिले. “कोणत्याही गुन्हेगाराने रागात, व्यसनाधीनतेत किंवा नियोजनबद्ध पद्धतीने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा होणे अटळ आहे. गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करून त्यांना तुरुंगात डाबा,” असे निर्देश चंद्राबाबू नायडू यांनी पोलिसांना दिले आहेत.