CJI B R Gavai : सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान सोमवारी राकेश किशोर या वकिलाने सरन्यायाधीश बीआर गवई यांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. राजकारणी किंवा विशिष्ट पदांवरील व्यक्तींवर होणाऱ्या या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांत राजकीय नेत्यांवर बूट फेकल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु, निषेध व्यक्त करण्यासाठी बूट किंवा चप्पलच का फेकतात? आजवर कोणकोणत्या नेत्यांवर असे हल्ले झाले? निषेध करण्याची ही मानसिकता येते कुठून? त्याविषयी सविस्तर समजून घेऊयात…
नेमकं प्रकरण काय?
- सर्वोच्च न्यायालयात काल (सोमवारी) सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला.
- बार अँड बेंचच्या अहवालानुसार, ही घटना घडली तेव्हा गवई खंडपीठासमोर खटल्यांचा उल्लेख करत होते.
- न्यायालयाबाहेर पडताना हल्ला करणाऱ्या वकिलांनी ओरडून म्हटले की, “भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.”
- या घटनेवर बी. आर. गवई म्हणाले, “या सर्व गोष्टींमुळे विचलित होण्याची गरज नाही, अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही.”

हल्ला करणारे वकील राकेश किशोर यांनी म्हटले की, त्यांना या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नाही. “आपण तुरुंगवास भोगण्यास तयार आहोत” आणि “दैवी शक्तीमुळे” हे कृत्य केल्याचा दावाही किशोर यांनी केला, असे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना वकील राकेश किशोर म्हणाले की, “मी तुरुंगात असतो तर बरे झाले असते. माझ्या कृत्यामुळे माझे कुटुंबीय खूप नाराज आहे, ते समजू शकत नाहीत.” ते म्हणाले, “खजुराहो खटल्यातील विष्णू मूर्तीचा संदर्भ देत किशोर म्हणाले की, “त्या निकालानंतर मला झोप येत नव्हती. सर्वशक्तिमान देव मला दररोज रात्री विचारत होते की, इतक्या अपमानानंतरही मी इतका शांत कसा राहू शकतो.”

राजकीय नेत्यांवर झालेल्या बूट फेकण्याच्या घटना
मनमोहन सिंग : एप्रिल २००९ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग अहमदाबादमधील एका सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांच्या दिशेने फेकलेला बूट खूप दूर पडला. बूट फेकणारा एक अभियांत्रिकी विद्यार्थी होता, त्याला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले. परंतु, सिंग यांनी त्याला माफ करायचा निर्णय घेतल्याने त्याची सुटका करण्यात आली. या विद्यार्थ्याने कोणत्याही राजकीय पक्षाशी आपला संबंध नसल्याचे सांगितले आणि केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही कृती केल्याचे मान्य केले.
पी. चिदंबरम : २००९ मध्ये पत्रकार जरनैल सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर बूट फेकला. १९८४ च्या शीख दंगलीतील आरोपी आणि काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना सीबीआयने ‘क्लीन चिट’ दिल्यामुळे ते संतप्त झाले होते. या पत्रकाराला ताब्यात घेण्यात आले होते, परंतु नंतर त्याचीही सुटका करण्यात आली.
लालकृष्ण अडवाणी : २००९ मधील सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान भाजपाचे पंतप्रधानपदाचे प्रमुख उमेदवार असलेल्या अडवाणी यांच्यावर भाजपाच्याच एका माजी पदाधिकाऱ्याने लाकडी चप्पल फेकली होती. पवन अग्रवाल नावाच्या या व्यक्तीने अडवाणी यांना ‘खोटा लोहपुरुष’ म्हटले आणि ते भाजपाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी पात्र नसल्याचे सांगितले.

ओमर अब्दुल्ला : १५ ऑगस्ट २०१० रोजी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यादरम्यान बूट फेकण्यात आला. आक्रमक व्यक्ती सामान्य तरुण नसून एक पोलिस हवालदार असल्याने सुरक्षेतील त्रुटीच्या भीतीला यामुळे वाव मिळाला.
राहुल गांधी : जानेवारी २०१२ मध्ये देहरादूनमध्ये एका निवडणूक सभेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर बूट फेकण्यात आला होता.
अरविंद केजरीवाल : ९ एप्रिल २०१६ रोजी अरविंद केजरीवाल सम-विषम योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करत असताना एका राजकीय कार्यकर्त्याने त्यांच्या दिशेने बूट फेकला. बूट फेकणाऱ्या वेद प्रकाश शर्मा नावाच्या व्यक्तीचा संबंध ‘आम आदमी पार्टी’च्या एका फुटीर गटाशी होता. त्याला ताब्यात घेण्यापूर्वी, त्याने सम-विषम योजना हा ‘सीएनजी घोटाळ्या’चा भाग असल्याचा आरोप केला होता. यापूर्वी, २००९ मध्ये ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ चळवळीचे नेते असतानाही केजरीवाल यांच्यावर बूट फेकण्यात आला होता.

केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही अशा अनेक घटना घडल्या आहेत. २००८ मध्ये इराकी पत्रकार मुंतझर अल-झैदी यांनी बगदादमध्ये एका पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यावर असाच हल्ला केला होता. परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांना लासास येथे भाषण देत असताना एका स्त्रीने बूट फेकून मारला होता. इराक युद्धाचा विरोध करणाऱ्या एका व्यक्तीने सैनिकाचे अध्यक्ष टोनी ब्लेअरवर २०१० मध्ये डब्लीन येथील एका पुस्तक समारंभात बूट फेकला होता. चीनचे अध्यक्ष वेन जिआबो हे केंब्रिज विद्यापीठात भाषण देत असताना त्यांच्यावर बूट फेकण्यात आला होता. अशा अनेक घटना इतर देशांतही घडल्या आहेत.
बूट फेकण्यामागील मानसिकता काय?
भारतात पुतळे जाळण्याबरोबरच बूट फेकणे हा निषेध नोंदवण्याचा एक प्रभावी आणि वारंवार वापरला जाणारा मार्ग आहे. बूट हे घाणेरडे मानले जातात, त्यामुळे उच्च-पदावर असलेल्या व्यक्तीला अपमानित करण्यासाठी किंवा त्याला लज्जित करण्यासाठी एक शस्त्र म्हणून त्याचा वापर केला जातो. २००८ मध्ये जेव्हा इराकी पत्रकार मुंतझर अल-झैदी यांनी बगदादमध्ये एका पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यावर हल्ला केला तेव्हा सर्वांचे लक्ष वेधले गेले होते.

कारण- त्यावेळी निषेध व्यक्त करण्यासाठी पहिल्यांदाच बूट फेकण्यात आल्याची घटना घडली होती. एक इजिप्शियन पत्रकार मोहम्मद अब्दू हसनेन बूट फेकणे किंवा बुटाने मारण्याची धमकी देणे, हा सर्वात मोठा अपमान असल्याचे सांगितले. याचे प्रतीकात्मक महत्त्व स्पष्ट आहे, बूट हे घाणेरडे असतात आणि आपण आपल्या पायाखाली असलेल्या गोष्टींवर वर्चस्व गाजवतो, असे ‘द गार्डियन’मध्ये म्हटले आहे.