नवी दिल्ली : राज्यातील महायुती भक्कम असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्रितपणे विधानसभेची निवडणूक लढू आणि जिंकू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. नक्षलवादाच्या समस्येसंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतलेल्या बैठकीमध्ये शिंदे सहभागी झाले होते. विज्ञान भवनात झालेल्या या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये पंधरा मिनिटे स्वतंत्र बैठक झाल्याचे समजते. महायुतीतील जागावाटप, महायुतीतील घटक पक्षांतील समन्वय आदी मुद्द्यांवर द्वयींमध्ये चर्चा झाल्याचे कळते. गेल्या आठवड्यामध्ये शहांनी दोन दिवसांचा मुंबई दौरा केला होता. या दौऱ्यात तसेच, त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यातही शहांनी महायुतीतील तीनही घटक पक्षांच्या नेत्यांशी जागावाटपासंदर्भात बोलणी झाली होती. त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासंदर्भात तर्कवितर्क केले जात होते.

महायुतीतील जागावाटपावरील चर्चा अंतिम टप्प्यात असून दसऱ्यानंतर याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सोमवारी दिल्ली दौऱ्यात शिंदे यांनी या मुद्द्यावर भाष्य करण्यास नकार दिला. जागावाटपावर मुंबईतच चर्चा केली जाईल, असे शिंदे म्हणाले. महायुतीतील तीनही घटक पक्ष भक्कम असून आम्ही एकत्र लढू, असेही शिंदेंनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Jammu and Kashmir Politics : जम्मू-काश्मीर विधानसभेचा उद्या निकाल; कोणता पक्ष ठरणार ‘किंगमेकर’?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीने केलेले काम आणि दोन वर्षांमध्ये महायुतीने केलेले काम यांची तुलना केली तर लोकांना दूध आणि पाणी यातील फरक कळेल. दोन वर्षांत आम्ही केलेले प्रकल्प आणि महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प, आम्ही केलेल्या कल्याणकारी योजना या सगळ्याचा हिशोब आम्ही जनतेसमोर मांडू. मग, जनतेने कोणत्या सरकारचा कारभार चांगला होता हे ठरवावे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला कामाची पोचपावती मतदारांकडून मिळेल आणि महायुतीच प्रचंड बहुमताने विजयी होईल, असे शिंदे म्हणाले.