Congress Revanth Reddy on Bandaru Dattatreya : हैदराबादमध्ये गेल्या रविवारी झालेल्या एका विशेष कार्यक्रमात हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे नेते आणि मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी तेगलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते ए. रेवंत रेड्डी यांनी दत्तात्रेय यांचा ‘अजातशत्रू’ (ज्याला शत्रू नाही) म्हणून उल्लेख केला. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीप्रमाणेच बंडारू दत्तात्रय यांनाही सर्वपक्षीय सन्मान मिळतो, असं मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलुगू देशम पक्षाचे प्रमुख चंद्रबाबू नायडू, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले. दरम्यान, कोण नेमके आहेत बंडारू दत्तात्रेय? हे जाणून घेऊ…

कोण आहेत बंडारू दत्तात्रेय?

७७ वर्षीय बंडारू दत्तात्रेय हे इतर मागासवर्गीय (OBC) समुदायातील असून ते मूळचे हैदराबादचे रहिवासी आहेत. १९६५ मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) प्रवेश करून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. १९६८ मध्ये संघाचे स्टार प्रचारक म्हणून दत्तात्रेय यांची नियुक्ती झाली. १९७९ पर्यंत त्यांनी संघ व त्यांच्याशी संलग्न असलेल्या विविध संस्थांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळल्या. सेवा भारतीचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेल्या बंडारू दत्तात्रेय यांनी नंतर भाजपात प्रवेश केला.

भाजपाच्या स्थापनेपासूनच दत्तात्रेय हे पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. १९८० मध्ये त्यांची आंध्र प्रदेश भाजपाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. १९८० च्या दशकात देशाच्या राजकारणात भाजपाचे स्थान मर्यादित असताना दत्तात्रेय यांनी सर्वसामान्यांबरोबर संपर्क वाढवला. “त्यावेळी भाजपाचा नेता म्हणून काम करणे सोपे नव्हते, तरीही बंडारू दत्तात्रेय यांनी लोकांशी आपुलकीचं नातं निर्माण केलं,” असे एका काँग्रेसच्या नेत्याने सांगितले.

bandaru dattatreya and pm narendra modi (PTI Photo)
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे माजी मंत्री आणि हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय (छायाचित्र पीटीआय)

आणखी वाचा : चंद्राबाबू नायडूंचे सरकार कशामुळे अडचणीत आलं? आंध्र प्रदेशात नेमकं चाललंय तरी काय?

दत्तात्रेय बंडारू यांची राजकीय कारकीर्द

  • १९८१ ते १९८९ या काळात दत्तात्रेय बंडारू यांनी आंध्र प्रदेशात भाजपाचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले.
  • १९९१ मध्ये त्यांनी पहिल्यांदा सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली.
  • २०१४ पर्यंत बंडारू दत्तात्रेय यांनी चारवेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला. काही वेळा त्यांना पराभवाचाही सामना करावा लागला होता.
  • १९९६ मध्ये बंडारू दत्तात्रेय हे पुन्हा आंध्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष झाले. २००६ ते २००९ दरम्यान त्यांनी ही भूमिका पार पाडली.
  • बंडारू दत्तात्रेय यांनी भाजपाचे राष्ट्रीय सचिव, कार्यकारिणी सदस्य व उपाध्यक्ष अशीही अनेक पदे भूषवली आहेत.

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात केलंय काम

बंडारू दत्तात्रेय यांनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात काम केले आहे. नंतर त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात (नोव्हेंबर २०१४ ते सप्टेंबर २०१७) दत्तात्रेय यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार सांभाळला. या काळात त्यांनी संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना मोठे सहकार्य केले. २०१४ मध्ये दत्तात्रेय हे मागासवर्गीयांच्या कल्याणासाठीच्या संसदीय समितीचे अध्यक्षही होते. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घनिष्ठ संबंध असल्यामुळेच दत्तात्रेय बंडारू यांचा राजकीय प्रवास अत्यंत सोपा राहिला, असे एका राजकीय निरीक्षकाने ‘The Indian Express’ला सांगितले. “संघाच्या पाठबळाशिवाय त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळालं नसतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बंडारू दत्तात्रेय अनेकदा वादाच्या भोवऱ्यात

बंडारू दत्तात्रेय यांच्या कारकिर्दीत काही वादही झाले. २०१६ मध्ये हैदराबाद विद्यापीठातील पीएच.डी. विद्यार्थी रोहित वेमुला यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. दत्तात्रेय यांनी तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहून काही विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती, जे जातीयवादी, अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी असल्याचा आरोप होता. रोहित वेमुला यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत असं म्हटलं होतं की, माझा जन्मच एक अपघात होता. त्यांनी केलेला हा उल्लेख देशभरात जातीय व्यवस्थेवर कठोर प्रश्न उपस्थित करणारा ठरला.

हेही वाचा : भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या ज्येष्ठ नेत्याची पक्षातून हकालपट्टी; नेमकं काय आहे कारण?

२०२४ मध्ये हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्यात रोहित दलित नसल्याचे नमूद करून आत्महत्येस कोणताही बाह्य दबाव कारणीभूत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. दत्तात्रेय आणि इतर आरोपींना या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली. या घटनेनंतर देशभरात दलित विद्यार्थ्यांवरील भेदभावाविरोधात आंदोलने झाली. दत्तात्रेय यांनी कोणतीही चूक न केल्याचे सांगितले. “या काळातही भाजपने त्यांना मंत्रिपदावरून दूर केले नाही,” असे एका विद्यार्थी नेत्यानं नमूद केलं.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात झाले राज्यपाल

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात बंडारू दत्तात्रेय यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०२१ मध्ये त्यांच्याकडे हरियाणाच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. बंडारू दत्तात्रेय यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या आत्मचरित्राच्या निमित्ताने त्यांच्या कार्याची सर्वपक्षीय पातळीवर प्रशंसा होत आहे. ‘प्रजाल कथा, ना आत्मकथा’ हे आत्मचरित्र बंडारू दत्तात्रेय यांचा सार्वजनिक जीवनातील प्रवास व संघर्षमय जीवन मांडणारा महत्वाचा दस्तावेज ठरला आहे.