मधु कांबळे

कामगार चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या आणि कट्टर काँग्रेसनिष्ठ असलेल्या अशोक ऊर्फ भाई जगताप यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन, मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मराठी मतांचा टक्का वाढविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

भाई जगताप हा काँग्रेसचा आक्रमक मराठी चेहरा आहे. त्यांची राजकीय जडणघडण काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून सुरू झाली. भाई जगताप हे प्रकाश झोतात आले ते कामगार नेते म्हणून. कामगार चळवळीमुळे त्यांची आक्रमक नेता म्हणून प्रतिमा तयार झाली. मात्र काँग्रेसची नाळ त्यांनी तोडली नाही.

काँग्रेसचे उमेदवार म्हणून २००४ मध्ये ते खेतवाडी मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्यांचेच समकालीन कामगार नेते सचिन अहिर यांना राष्ट्रवादीकडून मंत्रीपद मिळाले, परंतु भाई यांना ती संधी मिळाली नाही. मात्र तरीही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यानंतर २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचेमुळे त्यांना जोगेश्वरीमधून निवडणूक लढवावी लागली, मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला. परंतु पुढे मुंबई स्थानिक प्राधिकारण मतदारसंघातून त्यांनी विधान परिषदेत प्रवेश केला. दोन वेळा ते विधान परिषदेवर निवडून गेले. मागील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून जगताप यांनी अनेक प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले होते. सभागृहातील आक्रमक चेहरा म्हणून त्यांनी स्वतःची प्रतिमा तयारी केली आहे.

राममराजे नाईक – निंबाळकर : पवारांचे विश्वासू आणि साताऱ्यातील आधारस्तंभ!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली. पुढील चार महिन्यानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक होणे अपेक्षित आहे. भाईंचे राजकीय कार्यक्षेत्रही मुंबईच राहिले आहे. विधान परिषदेवर त्यांना संधी देण्यामागे मुंबई महापालिका निवडणुकीतील गणिते आहेत. पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या मुंबईच्या अध्यक्षाचा पक्षाने सन्मान केला हा कार्यकर्त्यांना संदेश द्यायचा आहे. भाईं जगताप यांच्यासारखा मराठी आक्रमक चेहरा पुढे करून मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतांचा टक्का वाढविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.