अलिबाग- कोकणात पक्षाला उभारी देण्याचे प्रयत्न सुरू झाले असले तरी जनाधार मिळविण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या असल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत काँग्रेस स्वबळावर निवडणूका लढवण्याच्या तयारीत आहे. तसे स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतेच अलिबागमध्ये दिले.
काँग्रेस पक्षातर्फे नुकतेच दोन दिवसीय रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे युवा कार्यकर्ता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या समारोप सत्राला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हजेरी लावली. लोकसभा आणि विधानसभा विधानसभा राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात काँग्रेसला कमी जागा मिळाल्या होत्या, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला एकही जागा लढवता आली नव्हती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली होती.
श्रीवर्धन, राजापूर मतदार या दोन मतदारसंघात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. मात्र बंडखोरांना मतदारांनी नाकारले होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणूका लढता येत नसतील तर पक्षात का राहायचे असा उद्वेग कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता. गेल्या काही वर्षात कोकणात काँग्रेसची सर्वाधिक वाताहत झाल्याचे पहायला मिळाले होते. बॅरिस्टर अंतुले यांच्या निधनानंतर जूने जाणते नेते पक्षाला सोडून गेले होते. त्यामुळे पक्षाची अवस्था रसातळाला गेली होती.
या सर्व पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना बळ आणि संधी देण्याचे धोरण पक्षाने स्विकारल्याचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. पक्षसंघटना नव्याने बांधणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्याचे धोरण पक्षाने स्वीकारले आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत आघाडी बाबत निर्णय घेण्याचे अधिकारी जिल्हा आणि तालुका कमिट्यांना देण्याचे प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केले आहे. प्रदेशाध्यक्षांच्या या घोषणे नंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत मात्र प्रश्न निर्माण झाले आहेत. पक्ष स्वबळावर निवडणूका लढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट संकेत यातून मिळत आहेत.