जालना : जालना लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्यावतीने कॉग्रेसचे कल्याण काळे यांची उमेदवारी जवळपास नक्की मानली जात आहे. परंतु पक्षाने पहिल्यांदा महाराष्ट्रातील ज्या उमेदवारांची नावे जाहीर केली त्यात कल्याण काळे यांचा समावेश नाही. गेल्या काही दिवसात काळे यांनी या मतदारसंघातील जालना, अंबड, भोकरदन तालुक्यांचा दौरा करुन महाविकास आघाडीतील पुढाऱ्यांची भेट घेतली. प्रामुख्याने भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचे आव्हान किती असेल याचा अंदाज त्यांनी या भेटी दरम्यान घेतला. आपली उमेदवारी पक्षाने अद्याप जाहीर केली नाही असे सावध वक्तव्य करत काळे यांनी हा दौरा केला असला तरी उमेवारीबाबत त्यांना वरिष्ठांकडून काही तरी शब्द दिला गेला असावा, असे त्यांच्या दौऱ्यातून दिसून आले.

काळे यांनी २००९ मध्ये दानवे यांच्याविरुद्ध लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी काळे यांचा पराभव झाला तरी ती निवडणूक अटीतटीची व चुरशीची झाली होती. त्यामुळे काळे यांच्या नावाला कॉग्रेसचे पदाधिकारी पंसती देत आहेत. जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, सत्संग मुंढे, राजेंद्र राख, कल्याण दळे, ही नावे चर्चेत आणण्यात आली होती. कल्याण काळे यांचे नाव निश्चित मानले जात असताना जिल्ह्यातील ओबीसी नेत्यास रिंगणात उतरवावे, अशी चर्चाही करण्यात आली. काॅग्रेसमध्ये ही चर्चा सुरू असताना धनगर समाजाच्या बैठकीत या मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवार म्हणून दीपक बोऱ्हाडे यांचे नावही जाहीर करण्यात आले. मा़त्र, नावाच्या घोषणेनंतर पत्रकार बैठकीत या अनुषंगाने विचारले असता ,‘ दानवे यांच्याविरुद्ध ओबीसीमधून एखादा उमेदवार महाविकास आघाडीने दिला तर त्यांच्या बाजूने आम्ही उभे राहू,’ असे सांगण्यात आले. महाविकास आघाडीने काळे यांच्याऐवजी ओबीसी प्रवर्गातील सक्षम व्यक्तीस उमेदवारी द्यावी असा या प्रतिक्रियेचा अर्थ होता.महाविकास आघाडीने ओबीसी उमेदवार दिला नाही तर ही मते भाजपच्या बाजूने जातील, अशी चर्चाही काही ओबीसी नेत्यांमध्ये सुरू आहे.

हेही वाचा… मुद्दा महाराष्ट्राचा… कोकण : सागरी, ग्रामीण आणि शहरी आव्हाने…

शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे शिवाजीराव चोथे यांचे नाव याच कारणामुळे उमेदवार म्हणून चर्चेत आहे. चोथे मागील चार दशकांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. तेही उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना वगळता अन्य पक्ष कॉग्रस व राष्ट्रवादीनेही त्यांचे मत ऐकून घेतले आहे. त्यामुळे ही जागा कॉग्रेसकडेच ठेवायची की घटक पक्षास सोडायची यावरही आता मंथन सुरू आहे. दोन- तीन दिवसापूर्वी काळे यांनीही शिवाजी चोथे यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली आहे. मागील सात लोकसभा निवडणुकीमध्ये कॉग्रेसचा जालना जिल्ह्यात पराभव झाला आहे. त्यापैकी पाच वेळेस रावसाहेब दानवे यांनी विजय मिळवला होता. त्यांना आता सहाव्यांदा भाजपने उमदेवारी दिली आहे.

हेही वाचा… चावडी : राज ठाकरे यांच्याकडे ‘शिवसेने’चे नेतृत्व?

निवडणुकीच्या राजकारणात पटाईत मानल्या जाणाऱ्या अनुभवी रावसाहेब दानवेंच्या विरोधात सक्षम उमेदवार कोण ठरू शकेल ते नाव अद्याप महाविकास आघाडीने जाहीर केलेले नाही. गावपातळीवर मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांची बांधणी करण्याचे काम भाजपकडून गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी मात्र आपला उमेदवार जाहीर करू शकलेली नाही.