पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी हे तीन भाजपचे महत्त्वाचे नेते असतानाही पुण्यातील कोथरुड परिसर गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांमुळे अशांत झाले आहे. महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असताना या टोळ्या भरदिवसा गोळीबार करत जीवघेणे हल्ले करत असल्याने कोथरूड शांत करण्याचे आव्हान या तिन्ही नेत्यांपुढे उभे राहिले आहे.

मोहोळ, पाटील आणि कुलकर्णी या तिघांचेही कार्यक्षेत्र हे कोथरुड आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीतील गुंडांनी कोथरुडमध्ये एकावर गोळीबार आणि दुसऱ्यावर कोयत्याने वार करून दहशत निर्माण केल्याचा प्रकार घडल्याने शांत कोथरुडमधील वातावरण पुन्हा अशांत झाले आहे.

पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात काही नावे सातत्याने चर्चेत राहिली आहेत. त्यामध्ये कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि कुख्यात गुंड गजानन मारणे हे दोघे आहेत. दोघांचेही कार्यक्षेत्र हे कोथरुड आहे. घायवळ हा ‘बॉस’ म्हणून ओळखला जातो , तर मारणे हा ‘महाराज’ या नावांने ओळखला जातो. २००० सालापासून म्हणजे २५ वर्षांपूर्वी त्यांनी कोथरुडमध्ये गुन्हेगारी कारवायांना सुरुवात झाली. तेव्हा घायवळ आणि मारणे हे दोघेही एकत्र होते. त्यांना एकाच्या खून प्रकरणात सात वर्षांची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांच्यात दरी निर्माण झाली आणि कोथरुड भागात टोळीयुद्ध सुरू झाले.

या संघर्षाला २००९ मध्ये सुरुवात झाली. मारणे टोळीने घायवळच्या खुनाचा प्रयत्न केला आणि सूडाची साखळी सुरू झाली. घायवळ टोळीतील गुंड पप्पू गावडे याचा खून मारणे टोळीने केला, तर गावडेच्या खुनाचा सूड घेण्यासाठी सचिन कुडले याचा खून घायवळ टोळीने केला. हे टोळीयुद्ध सुरू असताना पुण्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांनी त्यांच्याकडे तटस्थपणे पाहण्याची भूमिका घेतल्याचे दिसून येते.

दोघांच्या टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली. मात्र, निवडणुका आल्या की, त्यांच्या ताकदीचा वापर काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी करून घेतला. त्यामुळे त्यांचे राजकीय क्षेत्रात वजन वाढत गेलेले दिसते. मारणे याची पत्नी जयश्री मारणे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर पुणे महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत निवडून आल्या.

२०१७ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर मारणे याचे राजकीय क्षेत्रातील लागेबांधेही वाढत गेले. त्यामुळे त्याची तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावरून मोटार रॅली काढण्यापर्यंत मजल गेली. मारणेला १९९० आणि २०१२ असे दोन वेळा पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. घायवळ यालाही सध्या तडीपार करण्यात आले आहे. मात्र, या दोन टोळ्यांनी कोथरुडमध्ये वर्चस्व निर्माण केले असताना राजकीय पक्षांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून येते.

पुणे महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असताना शांत म्हणून ओळख असलेले कोथरुड अशांत झाले आहे. दोन मंत्री आणि एक खासदारांचे कार्यक्षेत्र असलेल्या कोथरुडला मूळ पदावर आणण्यासाठी पावले उचलली जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.