‘कर्नाटकमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली तर, मल्लिकार्जुन खरगेंना मुख्यमंत्रीपद दिले जावे, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी आहे’, असे विधान करून डी. के. शिवकुमार यांनी पक्षाला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. शिवकुमार व सिद्धरामय्या यांच्यातील मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा तीव्र झाली असली तरी, सर्वोच्च पदासाठी पक्षाने कोणाचेही नाव घोषित केलेले नाही.

काँग्रेसमध्ये निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री ठरवण्याची परंपरा नसल्याचे सांगत पक्षाध्यक्ष खरगेंनी या कळीच्या प्रश्नाला बगल दिली असली तरी, मुख्यमंत्रीपदी खरगेंचे नाव सुचवून शिवकुमार यांनी सिद्धरामय्यांविरोधात पक्षाध्यक्षांवर दबाव वाढवला आहे. ‘खरगे माझ्यापेक्षा २० वर्षांनी मोठे असून त्यांनी अनेकदा त्याग केला आहे. त्यामुळे आता त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली गेली पाहिजे, असे मत शिवकुमार यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेसने १६६ उमेदवारांची घोषणा केली असून ५८ जागांसाठी संभाव्य उमेदवारांसंदर्भात विस्तृत चर्चा झालेली आहे. राहुल गांधींच्या उपस्थितीत रविवारी खरगेंच्या निवासस्थानी बैठक होऊनही उर्वरित उमेदवार जाहीर झालेले नाही. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर न केल्यामुळे काँग्रेसने उमेदवार निवडीची घोषणा लांबणीवर टाकली असली तरी, सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्यातील मतभेदामुळेही उमेदवार निवडीसाठी अधिक दक्षता घेतली जात असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा – रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गटातील वाद पुन्हा उफाळला

कर्नाटकमध्ये २२४ पैकी १२० जागांचा पल्ला गाठता येईल असा अंदाज बांधला जात असल्याने सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्यामध्ये आत्तापासून रस्सीखेच सुरू झालेली आहे. मल्लिकार्जुन खरगे हे मूळ कर्नाटकचे असून तीन वेळा मुख्यमंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली होती. २०१३ मध्ये सिद्धरामय्यांनी त्यांची खुर्ची खेचून घेतली होती. कर्नाटकमध्ये ओबीसी समाजाकडे मुख्यमंत्रीपद देण्याच्या राजकीय नाईलाजामुळे अनुसूचित जातीतील खरगेंना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नव्हती. शिवकुमार यांनी खरगेंचे नाव पुढे करून अनुसूचित जातीतील व्यक्तीला मुख्यमंत्रीपद देण्याचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. कर्नाटकमध्ये अनुसूचित जातीकडे मुख्यमंत्रीपद द्यायचे असेल तर खरगेंसाठी सिद्धरामय्यांनी खुर्चीचा आग्रह सोडून दिला पाहिजे, असे शिवकुमार यांनी सुचित केले आहे.

खरगेंकडे पक्षाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी असून ते पुन्हा कर्नाटकमध्ये परत जाऊन मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही. गांधीतर व्यक्तीकडे पक्षाध्यक्ष पद देण्याच्या राहुल गांधींच्या आग्रहामुळे या पदासाठी निवडणूक घेतली गेली. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खरगेंची पक्षाध्यक्षपदी निवड केली आहे. पक्षाध्यक्ष गांधी कुटुंबाच्या विश्वासातील असली पाहिजे, ही पूर्वअटही खरगेंनी पूर्ण केली होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जेमतेम वर्षभराचा कालावधी उरला असताना खरगेंना पक्षाध्यक्ष पदावरून दूर करून काँग्रेसला आणखी अडचणीत आणण्याचा आत्मघात गांधी कुटुंबाकडून होण्याची शक्यता नाही. म्हणूनच खरगेंचे नाव चर्चेत ठेवून शिवकुमार यांनी खरगेंची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.

हेही वाचा – ‘हनुमान चालिसा’तून राणा दाम्‍पत्‍याची राजकीय खेळी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या निवडीसंदर्भात खरगे तटस्थ राहिले आहेत. सिद्धरामय्यांची लोकांमध्ये अधिक पकड असल्याचे मानले जाते पण, डी. के. शिवकुमार यांनी ‘भारत जोडो’ यात्रेत स्वतःची उपयुक्तता सर्वार्थाने सिद्ध केली होती. त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसने विजय मिळवला तर राजस्थानची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खरगेंना प्रयत्न करावे लागणार आहेत.