साधारण वर्षभराने आगामी लोकसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे काम करत आहे. त्यासाठी काँग्रेसचे नेते इतर राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी बातचित करत आहेत. दरम्यान, आज (१२ एप्रिल) दिल्लीमध्ये काँग्रेस, जेडीयू आणि आरजेडी या पक्षांच्या राहुल गांधी, नितीश कुमार तसेच तेजस्वी यादव या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या ऐक्यावर सखोल चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे या बैठकीनंतर विरोधकांच्या ऐक्यासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल आहे, असे भाष्य राहुल गांधी यांनी केले आहे. त्यामुळे आगामी काळात काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हेही वाचा >> चौकशीच्या फेऱ्यातही कोल्हापूर जिल्हा बँकेची आर्थिक प्रगती; सर्वपक्षीय नेत्यांना दिलासा

बैठकीनंतर राहुल गांधी यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

दिल्लीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी खासदार तथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी आदी नेत्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या ऐक्यावर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “विरोधकांना एकत्र आणण्यासाठीचे हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. आम्ही विरोधी पक्षांचा दृष्टीकोन विकसित करून पुढे जाणार आहेत. देशासाठी आम्ही सर्व पक्ष सोबत उभे राहू,” असे राहुल गांधी म्हणाले आहेत. तर आम्ही शक्य होईल तेवढे पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच आम्ही भविष्यात एकत्र लढणार आहोत, असे नितीशकुमार म्हणाले आहेत. बिहारामध्ये नितीशकुमार यांचा जेडीयू, तेजस्वी यादव यांचा आरजेडी आणि काँग्रेस पक्ष महायुतीच्या रुपात एकत्र आहेत. आगामी लोकसभा निवडणूकही ते एकत्र लढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >> चंद्रकांत पाटील वक्तव्यावरून नाराज पक्षश्रेष्ठींचा थेट हस्तक्षेप?

निवडणूक एकत्र लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे

या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधकांच्या ऐक्याचे महत्त्व विषद केले. “आज आमची दिल्लीमध्ये ऐतिहासिक बैठक झाली. या बैठकीत आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे,” असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

हेही वाचा >>Karnataka : ‘हिजाब’चा वाद निर्माण करणाऱ्या ओबीसी नेत्याला भाजपाकडून उमेदवारी, विद्यमान आमदाराचे तिकीट कापले!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे, स्टॅलिन यांच्याशी काँग्रेसची चर्चा

दरम्यान, मंगळवारी सकाळी नितीशकुमार दिल्लीमध्ये दाखल झाले होते. त्यांची काँग्रेसच्या बड्या नेत्यांसोबत बैठक झाली आहे. ते दिल्लीमध्ये विरोधी पक्षांच्या इतर महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. त्यांनी नुकतेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एकत्र लढण्याविषयी चर्चा केली आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस विरोधकांना एकत्र करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.