नवी दिल्ली : भाजपमध्ये राष्ट्रीय स्तरावरील सत्तास्पर्धा तीव्र झाल्याचे दिसू लागले असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याची चर्चा गुरुवारी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची अध्यक्षपदाची मुदत संपुष्टात आली असली तरी नव्या अध्यक्षाबाबत पक्षाकडून अद्याप कोणतेही स्पष्ट संकेत देण्यात आलेले नाहीत.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात वृत्तांकन करणाऱ्या हिंदी व इंग्रजी माध्यमांच्या प्रतिनिधींपैकी अनेकांनी गुरुवारी भाजप नेत्यांकडून संभाव्य अध्यक्षाचे नाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या चर्चांमध्ये अन्य काही नावांबरोबरच फडणवीस यांचेही नाव प्रामुख्याने घेतले जात होते. फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारण सक्रिय केले जाईल असे बोलले जात असले, तरी विधानसभेची निवडणूक असल्याने याबाबत तातडीने निर्णय घेतले जाण्याची शक्यता नाही. त्याऐवजी सध्या केंद्रीय मंत्र्यांपैकी एखाद्याची अध्यक्षपदी वर्णी लागू शकेल, असे मानले जात आहे. त्यासाठीही नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. असे असले, तरी गुरुवारी फडणवीसांच्या संभाव्य नियुक्तीबाबत दिल्लीत जोरदार चर्चा सुरू होती.

हेही वाचा >>>पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसचा हक्कभंग प्रस्ताव; याआधी कोणत्या पंतप्रधानांविरोधात आणला गेला आहे हा प्रस्ताव?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चांगले सूत जुळले असून महायुतीच्या जागावाटपापासून निवडणूक रणनीतीपर्यंत अनेक निर्णय शहांशी थेट चर्चा करून घेतले जात आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने दिल्लीचे दौरे करत आहेत. महायुतीत तीन प्रमुख नेत्यांपैकी दोन नेते थेट शहांशी संपर्क साधत असल्याने फडणवीस यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार उरले नसल्याचे मानले जात आहे. त्यामुळे फडणवीस यांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच दिल्लीत स्थलांतरित होण्यास सांगितले जाईल आणि त्यांच्याकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल अशीही एक चर्चा आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही मुख्यमंत्रीपदावरून हटवले जाणार असल्याचा दावा केला जात होता. त्याचप्रमाणे आता फडणवीस यांना पक्षाध्यक्ष केले जाणार असल्याचे वृत्त दिल्लीच्या वर्तुळात फिरवले जात असल्याचे मानले जात आहे.

चर्चेतील अन्य नावे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीस यांच्याबरोबरच केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव यांच्या नावांचाही अध्यक्षपदासाठी विचार केला जाऊ शकतो. चौहान यांना पक्ष व प्रशासनाचा मोठा अनुभव असून भाजपमध्ये त्यांना आदराचे स्थान आहे. खट्टर मोदींच्या अधिक जवळचे मानले जातात. फडणवीस यांचेही मोदींशी अधिक सलोख्याचे संबंध असल्याचे बोलले जाते, तर प्रधान व यादव हे दोघे शहांचे निकटवर्तीय मानले जातात.