राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण ताणल्या गेलेल्या राजकीय संबंधांना अखेर पूर्णविराम मिळण्याच्या चर्चांना डोंबिवलीत जोर आला आहे. या दोन नेत्यांमधील विसंवादामुळे डोंबिवली शहरातील काही महत्त्वाचे विकास प्रकल्प रखडले होते. या प्रकल्पांना गेल्या काही दिवसांपासून अचानक गती मिळू लागली असून चव्हाण आणि शिंदे यांच्यातील मनोमिलनाचा हा परिपाक असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सरकार राज्यात स्थापन होताच डोंबिवलीत शिंदे गटाने भाजपचे स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांची जागोजागी कोंडी करण्यास सुरुवात केली होती. भाजप सरकारच्या काळात राज्यमंत्री असताना रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीसाठी ३७५ कोटींचा निधी रस्ते कामांसाठी मंजूर करून आणला होता. रविंद्र चव्हाण आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले. मात्र मागील चार वर्षांत शिंदे यांच्या खासदार पुत्राचे महत्त्व ठाणे जिल्ह्यात वाढले आणि त्यांनी चव्हाण यांची मिळेल तिथे कोंडी सुरू केली. याचा परिणाम डोंबिवलीतील विकासकामांवरही पहायला मिळाला. डोंबिवलीच्या विकासासाठी निधी मिळत नाही, मिळालाच तर तो अडवून ठेवला जातो अशी जाहीर ओरड मध्यंतरी चव्हाण यांनी केली होती.

हेही वाचा – यवतमाळ – वाशिम मतदारसंघावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच

वारे पलटले

शिंदे-चव्हाण यांच्यातील निधी वाद टोकाला पोहोचला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरकारमधून बाहेर पडले. नंतरच्या सगळ्या राजकीय नाट्याचे दिग्दर्शन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिल्लीच्या आदेशावरून रवींद्र चव्हाण यांनी पार पाडले. चव्हाण यांच्या पाठराखणीमुळे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालो याची जाणीव एकनाथ शिंदे यांच्या मनात असली तरी सुपुत्र खासदार शिंदे यांच्या मनात चव्हाण यांच्या विषयी सल कायम राहिल्याचे दिसत होते. कल्याण-डोबिवली शहरांसाठी खासदार शिंदे यांनी एक हजाराहून अधिक कोटी रुपयांचा निधी आणला. खासदार शिंदे यांच्या कामाच्या धडाक्यापुढे चव्हाण फिके पडतील अशी रणनिती शिंदे गोटातून सातत्याने आखली जात होती. त्यामुळे या दोन नेत्यांमधील विसंवाद दिवसागणिक वाढत होता. खासदार शिंदे यांच्या आक्रमक बाण्याला वेसण घालण्यासाठी भाजपने मध्यंतरी कल्याण लोकसभेवर दावा ठोकला. त्यामुळे या दोन पक्षांत विसंवाद वाढत असतानाच गेल्या काही दिवसांतील घडामोडीमुळे मात्र चव्हाण-शिंदे यांच्यातील मनोमीलनाची चर्चा जोर धरू लागली आहे.

विकास प्रकल्प मार्गी

शिंदे गटाकडून समाज माध्यमातून रवींद्र चव्हाण यांना लक्ष्य करण्याचा प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरू होता. तो आता पूर्णपणे थांबला आहे. रस्ते कामांसाठी मंत्री चव्हाण यांचा ३७१ कोटीचा रखडलेला निधी शासनाकडून आता वितरीत होऊ लागला आहे. मागील २० वर्षांपासून डोंबिवलीतील विष्णुनगर मासळी बाजार, टिळक रस्त्यावरचे सुतिकागृह, आयरे-भोपर वळण रस्ता, डोंबिवली विभागीय कार्यालयाचा पुनर्विकास हे चव्हाण यांच्या मतदारसंघातील अनेक वर्षे रखडलेले प्रकल्प आता मार्गी लागत आहेत. हे प्रकल्प मार्गी लागत असताना एरवी चव्हाण यांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे रहाणारे खासदार शिंदे यांचे समर्थक माजी नगरसेवक मात्र चिडीचूप झाल्याचा अनुभव राजकीय वर्तुळात सर्वांना येत आहे.

हेही वाचा – नितीश कुमारांची गुगली; मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीआधी पोहोचले अटलबिहारी वाजपेयींच्या समाधिस्थळी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भाजपचे माजी नगरसेवक आता खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत विकास प्रकल्पांची पाहणी करत आहेत. झेंडावंदनसाठी एकत्र आले होते. मंत्री रवींद्र चव्हाण यांना ठाणे येथे झेंडावंदनाचा मान मिळाला. डोंबिवलीतील अनेक वर्षांचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागत आहेत. चव्हाण-खासदार शिंदे यांच्या मनोमिलनामुळे हे शक्य होत आहे.” – राजेश कदम, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे समर्थक).