नागपूर : ‘तिरंगा यात्रेत’ सावनेरचे भाजपचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी वाहतूक नियमांचा भंग केल्यामुळे उशिरा का होईना पोलिसांंनी त्यांना अडिच हजार रुपयांचा दंड केला. वरवर ही कारवाई नियमभंग केला म्हणून केलेली वाटत असली तरी सत्ताधारी पक्षातील उन्मादी प्रवृत्तीला मुक्यमंत्र्यांनी दिलेला एक इशाराच मानला जात आहे.

नागपूरमध्येच राजकीय कारकीर्द घडल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा चाहता वर्ग या शहरात आहे. हा वर्ग जेवढा भाजपमध्ये आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक तो इतर पक्षात किंवा राजकीय पक्षांशी संंबंध नसेलल्या क्षेत्रातही आहे. अनेकांची त्यांची थेट ओळख असल्याने ते सर्व जण ‘ मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीय’ अशी आपली प्रतिमा निर्माण करून सार्वजनिक ठिकाणी वावरत असतात. अशा प्रकारच्या प्रवृत्तीची संख्या भाजपमध्ये, विशेषत: लोकप्रतिनिधींमध्ये अधिक आहे. सावनेरचे आमदार डॉ. देशमुख हे त्यापैकीच एक आहेत.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षातील नेत्यांचे वागणेच बदलले. उन्मादी वृत्ती वाढली, आपले कोणीच काही बिघडवू शकत नाही, असा समज निर्माण झाला, राज्य मंत्रिमंडळातील एका सदस्याने तर ‘आपला बाप (गृहमंत्री) सागर बंगल्यावर बसला आहे’ असे विधान केले होते. अशाच प्रकारची प्रवृत्ती कमी अधिक प्रमाणात नागपूर शहर व जिल्ह्यात रुजली. याचेच प्रतीक म्हणून सावनेरमध्ये आमदार आशीष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेकडे बघितले जाते. देशमुख यांनी बंदोबस्तावर असलेल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्याची दुचाकी घेतली, त्याना मागे बसवून ते स्वत: दुचाकी चालवू लागले. त्यांच्या डोक्यावर हेल्मेट नव्हते. नागपुरात हेल्मेट शिवाय वाहन चालवणे गुन्हा आहे, पण कायदे -नियम आपल्यासाठी नाहीच या अविर्भावात त्यांचा यात्रेतील प्रवास होता. त्यांनी दुचाकीवर स्टंटही केेले. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे कारवाईचे अधिकार आहेत ते पोलीस अधिकारीच देशमुखांच्या मागे बसले होते. हे चित्र पोलिसांची लाचारी आणि सत्ताधाऱ्यांचा उन्माद हे दोन्ही दर्शवणारे होते. त्यामुळेच हा व्हीडीओ व्हायरल होताच आमदार देशमुख आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका होऊ लागली. आमदार मुख्यमंत्र्याचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार का ? असा प्रश्न विचारल्या जाऊ लागला.

मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

गुरूवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एका रस्त्यचे उद्घाटन झाले. त्यावेळी भाषण करताना त्यांनी ‘रस्त्यावर स्टंट कोणी करणार असेल तर त्याला नोटीस मिळणारच, ” असे विधान केले. वास्तविक हे त्यांचे विधान मुंबईच्या संदर्भातील होते. पण त्यातील ‘स्टंट’ हा शब्द सावनेरलाही लागू होता. मुख्यमंत्र्याच्या विधानाचा काय तो अर्थ पोलीस खात्याने घेतला आणि सुत्रे हलली. घटनेनंतर दोन दिवस शांत बसलेल्या पोलिसांनी गुरुवारी रात्री थेट देशमुख यांना अडीच हजार रुपयांच्या दंडाची चालानच पाठवली. हेल्मेट न घालता वाहन चालवणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे या प्रकरणात पोलिसांनी वरील कारवाई केली.

आमदार देशमुख यांच्यावर दंडात्मक कारवाई झाल्याने पोलिसांवर होत असलेल्या टीकेची धार आता सौम्य होईल, मात्र या कारवाईतून सत्ताधारी पक्षातील उन्मादी कार्यकर्त्यांना नेत्यांना गेलेले संदश महत्वाचा आहे, आपल्यावरही कारवाई होऊ शकते, अशी भीती आता यातून निर्माण होऊ शकते, असे एका भाजप नेत्याने सांगितले.

इतरांवरील कारवाईचे काय ?

सावनेरमधील तिरंगा रॅलीत फक्त आमदार देशमुखच नव्हे तर त्यात सहभागी झालेले शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी हेल्मेट घातले नव्हते. स्वत: पोलीस अधिकारी जे आ. देशमुख यांच्या मागे बसले होते त्यांनीही हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे या सर्वांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.