छत्रपती संभाजीनगर : ‘आम्ही साव ते चोर’ हा खेळ आता भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पाणीप्रश्नावरुन पुन्हा मांडला जात आहे. पाणी नियोजनातील त्रुटी दूर करण्याचे कारण पुढे करुन शिवसेना ठाकरे गटाने घेतलेले ३४ दिवसाचे आंदोलन हे प्रश्न सोडवणुकीपेक्षाही संघटनात्मक मरगळ दूर करण्यासाठी वापरण्यात आले. गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटाला गळती लागली होती. त्यामुळे शिवसैनिकातील सरकार विरोधाची मानसिकतेला बळ देत संघटना बांधणी करत मुख्यमंत्री विरोधाचे वातावरण संभाजीनगरमध्ये केले जात आहे. यावर भाजपचे नेतेही आता आक्रमक होऊ लागले आहेत.
गेल्या महिनाभरातील शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू असणाऱ्या आंदोलनाबाबत बोलताना अपारंपरिक उर्जामंत्री अतुल सावे म्हणाले, ‘ अडीच वर्षे त्यांच्या हातात सत्ता होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा काय केले. तेव्हा काय केले ? आता हे सारे ‘ चोराच्या उलट्या …’ या म्हणीप्रमाणे सुरू आहे. खरी गोम वेगळीच आहे. गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५२ हजार कोटींचे उद्योग आणले. त्याचे नाव सर्वसामांन्य माणसाच्या ओठी आहे. त्यामुळे पोटात दुखत आहे.’
शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमूख राजू वैद्य म्हणाले, ‘ आम्ही खूप सारे आरोप करू शकलो असतो. पण तसे आरोप आम्ही भाजपवर केले नाहीत. पाणी पुरवठा योजनेतील अनेक त्रुटी, भ्रष्टाचार, उणिवा आम्ही वेळोवेळी पत्राव्दारे सरकारपर्यंत पोहचवल्या आहेत. पण आरोप – प्रत्यारोप करणे हा आमचा उद्देश नव्हताच. केवळ नियोजन करुन पाणी द्या, एवढाच आमचा उद्देश होता. या मोर्चातून तो संदेश पोहचविण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत.’
गेल्या काही दिवसापासून शिवसेना एकनाथ शिंदे गटात जाणाऱ्या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. माजी महापौर नंदकुमार घोडले यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी सत्तेबरोबर राहणे पसंत केले होते. त्यामुळे ठाकरे गटात मरगळ आली होती. हे शिवसेनेतील नेते मान्य करतात. या आंदोलनातून कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण करण्यात यश आल्याचे शिवसेनेतील एका पदाधिकाऱ्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर हे मत व्यक्त केले.
या उपक्रमादरम्यान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनाही सहभागी करुन घेत आम्ही मेळ बसवत आहोत, असा संदेशही अंबादास दानवे यांनी आयोजित केलेल्या आंदोलनातून आवर्जूून देण्यात आला. या आंदोलनास किती गर्दी होईल या विषयी शंका घेतल्या जात होत्या. मात्र, तरुणांमधून प्रतिसाद मिळावा म्हणून ‘ लाबाडानों पाणी द्या’ चे रॅप गाणे तयार करण्यात आले. आदित्य ठाकरे यांनीही गाडीतून न जाता मोर्चात चालत सहभाग नोंदवल्याचे या वेळी दिसून आले.
या सगळ्या प्रक्रियेबाबत बोलताना मंत्री सावे म्हणाले, ‘ जर पाण्याचे नियोजन एवढे दिवस त्यांना कळत होते. तर त्यांनी अजूनही दोन दिवसाला पाणी देऊन दाखवावे. योजना पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्याला तेवढा वेळ द्यावाच लागणार आहे. शिवसेनेच्या आंदोलनामुळे त्यांची पोटदुखी तेवढी समोर आली आहे.’