जळगाव – जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी कोणीही कसाही असला तरी त्याला पक्षात घेण्याची भूमिका भाजपने घेतली असताना, तोच कित्ता आता शिवसेनाही (एकनाथ शिंदे) गिरवत आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून ठाकरे गटातून हकालपट्टी झालेल्या जिल्हाप्रमुखांना दुसऱ्याच दिवशी शिंदे गटात प्रवेश देण्यात आला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे युतीच्या माध्यमातून लढल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे म्हणत आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर विशेषतः भाजप आपल्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्यासाठी तयारीत राहण्याचे सांगत आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी तर जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी विरोधी पक्षांसह शिंदे गट आणि अजित पवार गट यांचे लोक फोडताना कोणीही कसाही असला तरी त्याला पक्षात घ्या. कुणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करु नका, असा सल्ला आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. विरोधात बोलणाऱ्यांना पक्षात घेऊन त्यांचे तोंड बंद करा. एक सुद्धा जागा काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांना मिळता कामा नये, असेही महाजन यांनी म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात भाजपच्या बरोबरीने नाही का असेना, किमान निम्या जागा तरी आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिंकू, अशी आशा  शिंदे गट बाळगून आहे. अर्थात, जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी झाली तशी युती झाली तरच शिंदे गटाचे निम्या जागांचे स्वप्न साकार होऊ शकणार आहे. त्यामुळे शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील हे युतीसाठी विशेष आग्रही आहेत. मात्र, भाजपकडून त्यांना अद्याप पाहिजे तसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. अशा परिस्थितीत भाजपसारख्या मोठ्या पक्षाशी दोन हात करण्याची वेळ आलीच तर आपणही तयारीत असावे म्हणून शिंदे गटाने आता इतर पक्षाच्या लोकांना आपल्या पक्षात प्रवेश देण्यावर भर दिला आहे. त्यात भाजपसह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा जास्तकरून समावेश आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी अमळनेरमधील भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. याशिवाय, ठाकरे गटाचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक राजपूत आणि शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरूण पाटील यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे राजपूत आणि पाटील यांची दोघांची पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून आदल्या दिवशीच ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती. तरीही दोन्ही पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात लगेच प्रवेश मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रावेर भागाचे जिल्हाप्रमुख दीपक राजपूत आणि शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरूण पाटील यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्या होत्या. त्यामुळे त्यांची ठाकरे गटातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. –गुलाबराव वाघ (सहसंपर्क प्रमुख, शिवसेना-उद्धव ठाकरे, जळगाव)