आम्ही शिवसेनेतच आहोत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच विचार पुढे नेत आहोत याचा वारंवार जाणीवपूर्वक पुनरुच्चार करणारे एकनाथ शिंदे व त्यांच्या गटातील मंत्री हे नव्या सरकारमध्ये शपथ घेताना ईश्वरा बरोबरच बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करून शपथ घेणार आहेत असे समजते.
महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधीवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आई-वडिलांचे स्मरण करून मुख्यमंत्रीपदाची ईश्वरसाक्ष शपथ घेतली होती. आता शिवसेना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काँग्रेस व राष्ट्रवादीसोबतच्या आघाडी विरोधात बंड करताना एकनाथ शिंदे व त्यांच्या गटातील आमदार वारंवार आम्ही शिवसेनेतच आहोत आणि बाळासाहेबांचेच विचार पुढे नेत आहोत असा दावा करत आहेत. शिवसेना विधिमंडळ गट म्हणजे आम्हीच हे ठसवण्याचा शिंदे गटाचा हा प्रयत्न आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी राजकारणाचे वारसदारही उद्धव ठाकरे नसून आम्हीच आहोत असेही शिंदे गटाला ठसवायचे आहे.




आता याचाच पुढचा भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येणारे सरकार हे भाजप शिवसेना युतीचे आहे अशी मांडणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून आणि उद्धव ठाकरे यांना डिवचण्यासाठी फडणवीस सरकारच्या शपथविधीवेळी शिंदे गटातील आमदार हे जाणीवपूर्वक बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मंत्रीपदाची शपथ घेताना घेणार आहेत. न्यायालयीन लढाई आणि शक्य झाल्यास निवडणूक आयोगातील लढाईत आम्ही म्हणजेच शिवसेना हा दावा जोरकसपणे करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याची रणनीती शिंदे गटाने ठरवली आहे.