‘मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे’, अशी भूमिका शिवेसेनेच्या वर्धापनदिन मेळाव्यात मांडणारे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात महायुतीचा भगवा फडकावयचा आहे, असे कार्यकर्त्यांना आवाहन केल्याने शिंदे यांच्या बदलत्या भूमिकेविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

दसरा मेळाव्यातील भाषणात शिंदे यांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत महायुतीची सत्ता आणायची आहे, असे आवाहन केले. लोकसभा व विधानसभा जिंकलो. आता महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये महायुतीला यश मिळावे म्हणून प्रयत्न करण्याची सूचना शिवसैनिकांना केली.

शिंदे हे महायुती हा सतत उल्लेख करीत असताना नेमके त्याच दिवशी नवी मुंबईतील मेळाव्यात वनेमंत्री गणेश नाईक यांनी स्वबळावर लढून भाजपचा महापौर निवडून येईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. ठाण्यात स्वतंत्र लढण्याची भाजपच्या कार्यकर्त्यांची मानसिकता झाली आहे. शिंदे यांच्या ठाणे व पालघर या प्रभाव क्षेत्रातच भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून स्वबळाचा सूर आवळला जात असताना शिंदे यांनी महायुतीचा उल्लेख केला असला तरी भाजपचे स्थानिक नेते युतीतून लढण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी त्यांच्या मनोमीलनाची चिंता नाही, असा संदेश एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला. वास्तविक ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबईत मोठा फटका हा शिंदे यांनाच अधिक बसू शकतो. कारण शिंदे यांची सारी मदार ही मराठी मतांवर आहे. गुजराती किंवा उत्तर भारतीय बहुल प्रभागांमध्ये भाजप शिंदे यांच्यासाठी जागा सोडणे अशक्य आहे.

शिंदे यांना मराठी मतदार असलेल्या प्रभागांमध्येच ताकद दाखवावी लागणार आहे. तेथे शिवसेना व मनसे एकत्र लढल्यास त्याचा साहजिकच फटका शिंदे यांना बसू शकतो. ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाल्यापासून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांचा मुंबईतील ओघ आटल्याचे बोलले जाते. ठाण्यात शिंदे यांना चांगल्या यशाची अपेक्षा आहे. त्यापाठापोठ मराठवाड्यावर शिंदे यांची मदार होती.

पण मराठवाड्यात आलेल्या पुरामुळे घरेदारे उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. त्याचा साहजिकच फटका शिंदे यांच्या शिवसेनेला बसू शकतो. ही सारी पार्श्वभूमी लक्षात घेता शिंदे यांनी शिवसेनाऐवजी महायुतीचा पर्याय स्वीकारला असावा, अशी चर्चा आहे.

मुंबईत महायुती म्हणून रिंगणात उतरायचे तर अन्यत्र तिन्ही पक्षांनी स्वतंत्र लढायचे अशी एकूणच महायुतीतील व्यूहरचना ठरलेली आहे. अर्थात, बदलत्या राजकीय परिस्थितीत तिन्ही पक्षांना सर्व पर्याय खुले ठेवावे लागणार आहेत. यामुळेच स्वबळावर लढण्याऐवजी महायुतीचा पर्याय शिंदे यांना अधिक सोयीचा वाटत असावा.

महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय सरसकट झाल्यास त्यातून बंडखोरीला ऊत येऊ शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढण्याचे अजित पवार यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.