scorecardresearch

गुजरातच्या यशाने मुंबई भाजपमध्येही उत्साह, मुंबईतही मोदींची जादू चालणार ?

गुजरातमधील दणदणीत विजयामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून मुंबई महापालिका निवडणुकीतही मोठा विजय मिळविण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे.

गुजरातच्या यशाने मुंबई भाजपमध्येही उत्साह, मुंबईतही मोदींची जादू चालणार ?

उमाकांत देशपांडे

गुजरातमधील दणदणीत विजयामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून मुंबई महापालिका निवडणुकीतही मोठा विजय मिळविण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकास आणि भ्रष्टाचारमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असून मुंबईतही मोदींची जादू चालणार आणि भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेची सत्ता येणार, असा विश्वास मुंबई भाजप अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी ‘ लोकसत्ता ’ शी बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा >>>वंदना भगत : महिलांच्या प्रश्नांसाठी संघर्ष

मुंबईसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी सुरु केली आहे. मतदान केंद्र निहाय पक्ष कार्यकर्त्यांची फळी उभारली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची गेली २५ वर्षे सत्ता आहे. भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सध्या जोरदार जुंपली असून महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भाजपने आघाडी उघडली आहे. शिवसेनेविरोधात भाजपने रणशिंग फुंकले असून मुंबईत सध्या जागर सभा सुरु आहेत. गुजरातच्या जोरदार विजयामुळे मुंबई महापालिका निवडणुकीतही त्याचा चांगला लाभ मिळेल, असा विश्वास भाजप नेत्यांना वाटत आहे.

हेही वाचा >>>विधान परिषदेच्या २१ जागा रिक्त, सभापतीपदाची निवडणूक लांबणीवर

यासंदर्भात मुंबई भाजप अध्यक्ष शेलार म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व सर्वसमावेशक आहे. त्यांनी दाखविलेला विकासाचा मार्ग, भ्रष्टाचार विरहीत प्रशासन, नागरिकांचा विश्वास, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून निर्णयप्रक्रिया, घराणेशाही संपुष्टात आणणे, या सर्व बाबी मुंबईतही लागू आहेत. येथेही शिवसेनेची किंवा एका परिवाराची सत्ता गेली २५ वर्षे महापालिकेत आहे. ही भ्रष्टाचारी सत्ता आम्ही आता उलथून टाकणार आहोत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना मुंबईतही सुरु आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात केंद्र सरकार निधी देत असूनही त्या राबविल्या गेल्या नाहीत. फेरीवाल्यांचे पुनर्वसन किंवा प्रत्येक घरी शौचालय यासारख्या योजनांवर नीट काम केले गेले नाही. महापालिकेने सर्वांना आदर्श वाटेल किंवा उत्कृष्ठ उदाहरण दिले जाईल, असा कोणताही मोठा प्रकल्प राबविला नाही. कुठलेही उद्यान, क्रीडांगण, रुग्णालय, शाळा विकसित केल्या गेल्या नाहीत. केंद्र सरकारच्या मदतीने मेट्रो प्रकल्प, बुलेट ट्रेन प्रकल्पासह अनेक प्रकल्प मुंबईत सुरु आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारची कामगिरी आणि योजनांच्या माध्यमातून मुंबईकर नागरिकांचा मोठा लाभ होणार आहे.

हेही वाचा >>>राजकीय पोकळी भरून काढणे राष्ट्रवादीसाठी आव्हानात्मक

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहेच आणि मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मार्गावर आणखी पुढे जाईल. मुंबईतील मराठी नागरिकांबरोबरच गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय आणि सर्वच अमराठी बांधव भाजपबरोबर होतेच, हे २०१४ मध्ये लोकसभेत युतीत लढलो किंवा विधानसभेत स्वतंत्र लढलो, तेव्हा दिसून आले. मराठी व अमराठी सर्वच जातीधर्माचे मुंबईकर भाजपबरोबर यापुढेही राहतील, असा वि‌श्वास शेलार यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 14:00 IST

संबंधित बातम्या