कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला असताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांना लक्ष्य करीत आहेत. राज्यात नव्याने होऊ घातलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या भूमी संपादनावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या मुद्द्याचा खुबीने राजकीय वापर करून घेतला जात असून काँग्रेसच्या प्रचारात तो प्रकर्षाने मांडला जात आहे. भाजपला टीकेचा केंद्रबिंदू बनवला जात आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मात्र महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही दोघांवर फटकरे ओढले आहेत. या तापलेल्या वातावरणाचा काही मतदारसंघाच्या निकालावर परिणाम होऊ शकतो.

राज्यात नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग साकारला जाणार आहे. त्यासाठी २७ हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. भूमी संपादनाचे प्राथमिक काम सुरू झाले आहे. यापूर्वी मुंबई – नागपूर समृद्धी द्रुतगती मार्ग साकारला जात असतानाही शेतकरी, जमीनधारकांनी समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभारलेले होते. अनेक ठिकाणी आंदोलने होऊन शेतकऱ्यांना अटक, गुन्हे दाखल असे प्रकारही घडले होते. याच धर्तीवर शक्तिपीठ महामार्ग जात असलेल्या भागातूनही या प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी एकवटला जात आहे.

हेही वाचा…खडसे यांच्या खेळीने शरद पवार गटात संतप्त भावना

असमान मोबदल्याने ठिणगी

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहित केलेली जमीन रेडी रेकनर रेटप्रमाणे ठरविलेल्या किंमतीच्या दुप्पट किंमत व १०० टक्के नुकसान भरपाई, जमीनमालकास त्याच्या जागेच्या मूळ किंमतीच्या ५ पट अधिक रक्कम देण्यात येईल, असे जाहीर केले होते. तरी देखील तेथील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा सपाटा लावला होता. शक्तीपीठसाठी रेडीरेकनरच्या दुप्पट भरपाई दिली जाणार असल्याने ते अत्यंत कमी असल्याचा मुद्दा आंदोलक नेते उपस्थित करीत आहेत. हा फरक शेतकऱ्यांच्या मनात चीड निर्माण करणारा असल्याने आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे. नव्या कायदेशीर तरतुदीनुसार मूल्यांकनाचे दर शासनाने कमी केले असल्याने शेतकऱ्यांना पुरेसे पैसे मिळण्याची चिन्हे नसल्याने त्यांच्यात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. या भागातील जमीन ही बागायती, बारमाही फुलणारी, ऊस, केळी, द्राक्ष सारख्या नगदी पिकांची असल्याने ती कितीही नुकसान भरपाई मिळाली तरी द्यायचीच नाही या मानसिकतेत बरेच शेतकरी असल्याने त्यांच्या भावना तीव्र बनल्या आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या सर्वपक्षीय मेळाव्यात याबाबतच्या संतापाचे दर्शन घडले. आंदोलनात तुरळक प्रमाणात का असेना भाजपचेही लोकही सहभागी झाल्याचे दिसतात.

शेतकऱ्यांच्या भावना या सरकार विरोधी जात असल्याने इंडिया – महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा मुद्दा लोकसभा निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी आणला गेला आहे. काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. शक्तीपिठाच्या ठिकाणी दुसरे महामार्ग साकारले जात असल्याने पर्यायी मार्गाचा वापर न करता शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घातल्या जात आहेत. महामार्गावर पैसे खर्च करण्यापेक्षा तीर्थक्षेत्र विकासासाठी तो केला तर भक्तांना फायदा होईल. ठेकेदारांच्या हिताचा निर्णय राज्य शासनाने मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. तर लोकसभा निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ प्रकल्पावरून महाविकास आघाडी व महायुती या दोघांचाही समाचार घेण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा…‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च, ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ

शेतकऱ्यांच्या जमिनी जाण्यास राज्यातील महायुतीचे शासन कारणीभूत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नुकसान भरपाई कमी करण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे हि दोन्ही सरकारे या प्रकल्पाच्या दृष्टीने दोषी आहेत. शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी, सर्व्हेला येणाऱ्यांना ठोकून काढा, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. दुसरीकडे, इंडिया आघाडीच्या सभांमध्ये शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पामुळे शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका ठळकपणे अधोरेखित केला जात आहे. ‘ भाजप सरकारचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा धनदांडग्या लोकांसाठी आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा हा प्रकार आहे. या महामार्गामुळे ३० हजार एकर शेतजमीन संपुष्टात येण्याचा धोका आहे.

शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला हा धोका ओळखून या निवडणुकीत महायुतीला चितपट करा ,’ असे आवाहन कागलचे माजी आमदार संजय घाटगे यांनी शशू महाराज यांच्या प्रचार सभेत केले. अन्य सभांमध्ये हा मुद्दा जोरदारपणे मांडला जात आहे. शेतकऱ्यांच्या भावनांना खतपाणी घालून महायुतीवर त्यांचा रोष राहावा आणि पर्यायाने त्याचा फायदा महाविकास आघाडीला व्हावा, अशी रणनीती आखली गेली असल्याचे एकंदरीत हालचालीवरून दिसत आहेत. दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या भावना प्रबळ असल्याने महायुतीच्या नेत्यांची ऐन निवडणुकीत कोंडी झाली आहे.

हेही वाचा…अशोक चव्हाणांच्या मंत्रिपदासाठी मतदारांना भावनिक साद!

धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने साकारला जाणारा शक्तिपीठ महामार्ग हा निवडणुकीच्या प्रचाराचा एक महत्वाचा मुद्दा बनत चालला आहे. शेतकऱ्यांच्या भावनाही तीव्र आहेत. त्याला साद घातली जात असल्याने अनोलन तापत चाललेल्या पश्चिम महाराष्ट्र – कोकणातील सोलापूर, माढा, सांगली, हातकणंगले, कोल्हापूर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा निवडणुकीत या मुद्दाचा मतदारसंघाच्या निकालावर परिणाम होऊ शकतो.